भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून पळालेला मद्य सम्राट विजय मल्ल्या याच्या किंगफिशर एअरलाइन्सला कर्ज देण्यासाठी भारतीय बँकांनी नियम मोडले हे डोळे बंद केले तरीही समजते. ही प्रतिक्रिया आहे लंडनच्या वेस्टमिनिस्टर्स मॅजिस्ट्रेट कोर्टाच्या जज एमा आर्बथनॉट यांची. विजय मल्ल्याचे कर्ज बुडवण्याचे प्रकरण एखाद्या ‘जिगसॉ पझल’ प्रमाणे गुंतागुंतीचे आहे. जिगसॉ पझलमध्ये जसे तुकडे जोडले जातात आणि ते पूर्ण केले जाते अगदी तसेच या प्रकरणातही अनेक पुरावे एकमेकांशी जोडावे लागणार आहेत असेही आर्बथनॉट यांनी म्हटले आहे.

मागील काही महिन्यांच्या तुलनेत आता हे देखील स्पष्ट झाले आहे की विजय मल्ल्याला कर्ज देताना बँकांनी आपलेच नियम पायदळी तुडवले. कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रकरणाची सुनावणी लंडनच्या वेस्ट मिनिस्टर्स कोर्टात सुरु आहे. शुक्रवारी यासंदर्भात जज एमा आर्बथनॉट यांनी भारतीय बँकांचे आणि त्याचसोबत विजय मल्ल्याचे आपल्या शब्दांनी अक्षरशः कान टोचले. ‘झी न्यूज’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

विजय मल्ल्या म्हणतो की माझ्याविरोधात षडयंत्र रचले गेले आहे. या आरोपाबाबत बोलण्यासाठी भारतातील बँक अधिकाऱ्यांनी समोर यावे असेही एमा यांनी म्हटले आहे. तसेच काही बँक कर्मचाऱ्यांवरही घोटाळ्यात सहभागी असण्याचा आरोप आहे त्यावरही भूमिका स्पष्ट करावी. कर्जबुडव्या विजय मल्ल्याचे भारताकडे प्रत्यार्पण करावे यासाठी सीबीआयचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. विजय मल्ल्याचे प्रत्यार्पण झाले तरच भारतात त्याच्याविरोधात आर्थिक फसवणूक, कर्ज बुडवणे या संदर्भातला खटला चालवता येणार आहे. विजय मल्ल्या प्रकरणावरून सरकारवरही प्रचंड टीका झाली आहे.

नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांनीही पीएनबीला चुना लावला आणि विदेशात पलायन केले. या प्रकरणानंतरही विजय मल्ल्या ते नीरव मोदी या सगळ्या लोकांना कर्ज बुडवून पळून जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीची प्रोत्साहन दिले असा आरोप काँग्रेसने आणि इतर विरोधकांनी वारंवार केला आहे. अशात आता विजय मल्ल्याला भारतात आणणे हे सीबीआयसाठी मोठे आव्हान आहे.