पाच राज्यांपैकी तीन राज्यांमध्ये काँग्रेसच्या विजयानंतर पक्षाध्यक्ष राहुल गांधींना शुभेच्छा देण्यासाठी स्पर्धा लागली आहे. सगळीकडे या विजयाचे श्रेय राहुल गांधींच्या नेतृत्वाला देत आहेत. परंतु, या सर्वांमध्ये एका अशा व्यक्तीने सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्याच्या प्रत्यार्पणासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. त्या व्यक्तीचे नाव आहे विजय मल्ल्या. विजय मल्ल्याने आपल्या ट्विटरवरुन सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना विधानसभा निवडणुकीतील यशाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. मल्ल्याने काँग्रेस नेत्यांना दिलेल्या शुभेच्छांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

युवा चॅम्पियन, सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांना शुभेच्छा, असे विजय मल्ल्याने ट्विट केले आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी मल्ल्याने हे ट्विट केले आहे. मल्ल्याच्या या ट्विटचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.

भारतातील बँकांना ९ हजार कोटींचा गंडा घालून फरार झालेल्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणाचा रस्ता मोकळा झाला आहे. लंडन येथील वेस्ट मिनिस्टर न्यायालयाने मल्ल्याला भारतात पाठवण्यास परवानगी दिली आहे. सचिन पायलट आणि ज्योतिरादित्य शिंदे यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी चर्चेत असतानाच मल्ल्याने हे ट्विट केले आहे.