लंडनमधील न्यायालयात सुनावणी

भारतात सुमारे नऊ हजार कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या मद्यसम्राट विजय मल्या याचे भारतात प्रत्यार्पण व्हावे, यासाठी लंडनच्या वेस्टमिन्सटर मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणाचा निकाल सोमवारी (१० डिसेंबर) दिला जाणार असून त्यावेळी मल्या न्यायालयात हजर राहणार आहे.

न्यायाधीश ईमा अर्बुथनॉट हा निर्णय सुनावणार आहेत. गतवर्षी ४ डिसेंबरला ही सुनावणी सुरू झाली होती. याप्रकरणी ६२ वर्षीय मल्या यास गतवर्षी एप्रिलमध्ये येथे अटक झाल्यानंतर सध्या तो जामीनावर आहे. आपल्याविरुद्ध दाखल केलेला खटला हा राजकीय हेतूने प्रेरित असून सध्या बंद पडलेली आपली किंगफिशर एअरलाईन्स चालू ठेवण्यासाठी आपण बँकांकडून कर्ज घेतले होते, असा बचाव त्याने केला आहे. मी एका कवडीचेही कर्ज घेतले नाही. ते ‘किंगफिशर’ने घेतले आहे. सचोटीने केलेल्या व्यवसायातील अपयशामुळे हा पैसा बुडाला. त्याला मी जामीन असणे म्हणजे फसवणूक ठरत नाही, असे त्याने नुकतेच ट्विटर पोस्टमध्ये म्हटले होते.