भारतातील बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याच्या भारतवापसीसाठी प्रयत्न सुरु आहेत. केंद्र सरकारने लंडनमधील न्यायालयात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भात अहवाल दिला असून यानुसार भारतात आणल्यावर विजय मल्ल्याला आर्थर रोडमधील तुरुंगात ठेवण्यात येईल अशी माहिती सरकारने दिली आहे. विशेष म्हणजे आर्थर रोडमधील बराक क्रमांक १२ मध्ये मल्ल्याला ठेवण्यात येणार असून याच बराकमधील १२ ब या कोठडीत २६/११ च्या मुंबई हल्ल्यातील दोषी अजमल कसाबलाही ठेवण्यात आले होते.

ब्रिटनमध्ये पळालेल्या कर्जबुडव्या विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणासाठी केंद्र सरकारने ब्रिटन सरकारकडे पाठपुरावा केला आहे. लंडनमधील न्यायालयातही यासंदर्भात सुनावणी सुरु आहे. लंडनमधील न्यायालयात केंद्र सरकारने अहवाल सादर केल्याचे वृत्त ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. या अहवालात सरकारने विजय मल्ल्याच्या सुरक्षेसंदर्भातील माहिती दिली. विजय मल्ल्याला भारतात आणल्यावर आर्थर रोड तुरुंगात ठेवणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. आर्थर रोडमधील सुरक्षे व्यवस्थेविषयी सविस्तर उल्लेखही यात करण्यात आला आहे. आर्थर रोड कारागृहात विजय मल्ल्याच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असेल असे सरकारने अहवालात स्पष्ट केले. विजय मल्ल्याला आर्थर रोडमधील बराक क्रमांक १२ मध्ये ठेवण्यात येईल. याच बराकमधील १२ ब या कोठडीत अजमल कसाबला ठेवण्यात आले होते. तुरुंग प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेसंदर्भातील अहवाल तयार करुन केंद्र सरकारला पाठवला होता. केंद्र सरकारने सीबीआयमार्फत लंडनमधील न्यायालयात अहवाल सादर केल्याचे सूत्रांनी सांगितले. या अहवालामुळे मल्ल्याच्या प्रत्यार्पण प्रक्रियेला गती येईल अशी आशा आहे.

आर्थर रोड तुरुंग १९२५ मध्ये बांधण्यात आले असून या तुरुंगाची क्षमता ८०५ कैद्यांची आहे. सध्या या तुरुंगात २,५०० कैदी आहेत. जुलैमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि सीबीआयच्या संयुक्त पथकाने लंडनमध्ये अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. मल्ल्याचे प्रत्यार्पण आणि मल्ल्याविरोधात नवीन पुरावे लंडनमधील न्यायालयात सादर केले होते. जूनमध्ये ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्राचाही यात समावेश होता. पाच हजार पानी आरोपपत्रात मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन कंपनीची आर्थिक स्थिती वाईट आहे, हे ठाऊक असूनही आयडीबीआयने तब्बल ९०० कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केल्याचा दावा ईडीने केला होता.