स्टेट बँकेसह अनेक बँकांची कर्ज बुडवून भारताबाहेर पळून गेलेला कर्जबुडव्या उद्योगपती विजय मल्ल्या याच्या आलिशान जेट विमानाची अखेर आज लिलावादरम्यान विक्री करण्यात आली. एलएलसी या एका अमेरिकन कंपनीने या जेट विमानाची ३४ कोटी ८० लाखांना म्हणजेच ५.०५ मिलियन डॉलर्सला खरेदी केली. मल्ल्याच्या जेट विमानासाठी चौथ्यांदा लिलाव प्रक्रिया घेण्यात आली. त्यात अखेर विमानाचा लिलाव झाला.

‘VT-VJM’ ही मल्ल्याच्या नावाची आद्याक्षरे असलेल्या एअरबस ए३१९-१३३सी या जेट विमानाची लिलाव प्रक्रिया कर्नाटक उच्च न्यायालयाशी संबंधित असलेल्या अधिकाऱ्यामार्फत पार पाडण्यात आली. १.९ मिलियन डॉलर्स या मूळ किमतीपासून लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली होती. संपूर्ण प्रक्रियेत एलएलसी या अमेरिकन कंपनीने ३४. ८ कोटींची सर्वोच्च बोली लावली.

या आधी तीन वेळा सेवा कर विभागामार्फत ई-लिलाव प्रकिया घेण्यात आली होती. मात्र, चौथ्यांदा घेण्यात आलेल्या लिलाव प्रक्रियेत अमेरिकन कंपनीने लावलेली बोली ही आधीच्या तीनही लिलाव प्रक्रियांमध्ये लावलेल्या बोलीपेक्षा जास्त ठरली. दरम्यान, या बोलीबाबत मुंबई उच्च न्यायालयाची संमतीही आवश्यक आहे.

असे आहे हे आलिशान जेट विमान

मल्ल्याने हे जेट विमान आपल्या सोयी-सुविधांवर खास बनवून घेतले होते. या विमानातून एका वेळी २५ प्रवासी आणि ६ कर्मचारी प्रवास करू शकतात. विशेष म्हणजे या विमानात बेडरूम, बाथरूम, बार, कान्फरन्स रूम अशा सर्व सोयी आहेत. हे जेट विमान अत्यंत चांगल्या अवस्थेत असून या विमानाची किंमत १०० मिलियन इतकी असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.