भारतीय बँकांचे ९ हजार कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पसार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या लंडनमधील हवेलीवर लवकरच टांच येणार आहे. मल्ल्यासह त्याची आई व मुलगा यांना या हवेलीतून बाहेर काढण्यासाठी स्विस बँकेने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे मल्ल्या बेघर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाओमी कँटन येथील रिजेंट पार्क भागात असलेल्या आलिशान हवेलीत मल्ल्यासह त्याची आई ललिता व मुलगा सिद्धार्थ राहतो. ही हवेली गहाण ठेवून मल्ल्याने यूबीएस एजी या स्विस बँकेकडून २०१२ साली २०.४ दशलक्ष पौंडांचे कर्ज पाच वर्षांच्या मुदतीसाठी घेतले होते. मात्र मुदत संपली तरी त्याने कर्ज न फेडल्याने यूबीएस बँकेने या हवेलीचा ताबा मिळण्यासाठी ब्रिटनच्या हायकोर्टात दावा दाखल केला असून त्यावर २४ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे. मुदत संपूनही कर्ज न फेडल्याने मल्ल्या व त्याच्या कुटुंबीयांना ही हवेली सोडण्यास सांगण्यात आले होते, मात्र त्यांनी हवेलीतून बाहेर पडण्यास नकार दिला, असे बँकेने म्हटले आहे.