28 February 2021

News Flash

मल्ल्या लंडनला पळून जाणार हे अरुण जेटलींना आधीच माहित होतं – राहुल गांधी

देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती.

मी विजय मल्ल्याला भेटलो नाही हा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा खोटा आहे. देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती असा आरोप काँग्रेसने केला आहे.काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी सकाळी पत्रकार परिषद घेऊन अरुण जेटली खोटे बोलत असल्याचा आरोप केला.

मल्ल्या आणि जेटली यांच्यात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये भेट झाली त्यावेळी काँग्रेस नेते पुनिया तिथे उपस्थित होते असे राहुल गांधी म्हणाले. काँग्रेसचे नेते पुनिया म्हणाले कि, माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. एका कोपऱ्यात उभे राहून दोघांनी चर्चा केली. १ मार्च २०१६ रोजी ससंदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी जर खोटे बोलत असीन तर राजकारण सोडून देईन असे पुनिया यांनी सांगितले.

अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमधून आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांबद्दल माहिती दिली आहे पण याच भेटीबद्दल माहिती देणे त्यांनी का टाळले ? अरुण जेटली खोटे बोलत आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला आहे.

अर्थमंत्र्यांनी फरार आरोपी बरोबर चर्चा केली. मल्ल्याने तो देश सोडून लंडनला चाललाय हे अरुण जेटलींना सांगितले होते, मग त्यांनी सीबीआय, ईडी किंवा पोलिसांना याची माहिती का नाही दिली? असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे. अटकेची नोटीस माहितीच्या नोटीसमध्ये कशी काय बदलली ? ज्यांचे सीबीआयवर नियंत्रण आहे तेच अशा प्रकारे नोटीसमध्ये बदल करु शकतात असा आरोप राहुल गांधींनी केला.

मल्ल्या अर्थमंत्र्याबरोबर संगनमत करुन देशाबाहेर पळून गेला असा आरोप राहुल यांनी केला आहे. हे सरकार राफेल, विजय मल्ल्यावर खोटे बोलत आहे. अर्थमंत्र्यांनीच मल्ल्याला देशाबाहेर पळून जाण्यासाठी मोकळीक दिली. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राहुल यांनी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 1:28 pm

Web Title: vijay mallya met arun jaitly in parliament central hall congress
टॅग : Congress,Vijay Mallya
Next Stories
1 घरचा आहेर ! विजय मल्ल्यानंतर स्वामींचे अरुण जेटलींवर गंभीर आरोप
2 काँग्रेस विरोधकांची भूमिका निभावण्यातही अयशस्वी – नरेंद्र मोदी
3 पार्टीतला एकटीचाच फोटो फेसबुकवर शेअर केल्याने पतीची पोलीस ठाण्यात तक्रार
Just Now!
X