आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्याने कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ आणि आपला अप्रत्यक्ष संबंध असल्याचं सांगत काही गोष्टी समान असल्याचं म्हटलं आहे. सिद्धार्थ यांच्या माध्यमातून विजय मल्ल्याने बँका आणि तपास यंत्रणांवर निशाणा साधला आहे. कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू झाला आहे. नेत्रावती नदीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला. ते सोमवारपासून बेपत्ता होते. व्ही. जी. सिद्धार्थ यांना पत्रात प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून शोषण होत असल्याचा आरोप केला होता.

कॅफे कॉफी डेचे मालक व्ही. जी. सिद्धार्थ यांचा मृत्यू

व्ही. जी. सिद्धार्थ हे कॅफे कॉफी डेचे संस्थापक, मालक आणि भाजपा नेते एस. एम. कृष्णा यांचे जावई होते. दरम्यान सिद्धार्थ यांच्यावर करण्यात आलेली कारवाई नियमांनुसारच असून, आपल्याकडे काळा पैसा असल्याची कबुली त्यांनी दिली होती अशी माहिती प्राप्तिकर विभागाने दिली आहे.

या प्रकऱणावर विजय मल्ल्याने ट्विट केलं आहे. त्याने लिहिलं आहे की, “व्ही जी सिद्धार्थ आणि माझ्यात अप्रत्यक्ष संबंध आहेत. त्यांच्या पत्रामुळे मी हैराण झालो आहे. बँका आणि सरकारी यंत्रणा कोणालाही निराश करु शकतात. मी सर्व पैसे परत करण्याची ऑफर देऊनही ते माझ्यासोबत काय करत आहेत पहा. एकदम अयोग्य आणि निर्दयी”.

पुढे त्यांनी म्हटलं आहे की, “पश्चिम देशांमध्ये सरकार आणि बँका कर्ज घेणाऱ्यांना कर्ज फेडण्यासाठी मदत करतं. माझ्या प्रकऱणातही त्यांनी शक्य ती सर्व मदत करत आहेत”. विजय मल्ल्या सध्या लंडनमध्ये आहे. त्याच्यावर बँकांची ९ हजार कोटींची फसवणूक करुन फरार झाल्याचा आरोप आहे.