आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्याने खासगी आणि कौटुंबिक संपत्ती जप्त करण्यात येणाऱ्या कारवाईविरोधात केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. विजय मल्ल्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत संपत्ती जप्त करत करण्यात येत असलेल्या कारवाईवर स्थगिती आणण्याची मागणी केली आहे. मल्ल्याने याचिकेत मागणी केली आहे की, फक्त किंगफिशर कंपनीशी संबंधित संपत्ती जप्त केली जावी, खासगी आणि कौटुंबिक संपत्ती जप्त केली जाऊ शकत नाही.
सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी पार पडली. विजय मल्ल्याच्या वतीने एफ एस नरीमन न्यायालयात हजर होते. न्यायालयाने २ ऑगस्टला याचिकेवर सुनावणी करणार आहे.
याआधी विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाकडून जोरदार झटका मिळाला होता. मल्ल्याने उच्च न्यायालयात केलेली याचिका फेटाळण्यात आली होती. याचिकेत त्याने आपल्या आणि संपत्तीविरोधात करण्यात येणाऱ्या कारवाईवर स्थगिती आणली जावी अशी मागणी केली होती. कनिष्ठ न्यायालय आणि सरकारी तपास यंत्रणा माझी संपत्ती विकू शकतात, यावर स्थगिती आणली जावी असं विजय मल्ल्याने याचिकेत म्हटलं जातं.
याअगोदर २ जून रोजी लंडन उच्च न्यायालयाने मल्ल्याला दिलासा देत, प्रत्यार्पणाविरोधात आव्हान देण्यासाठी परवानगी दिली होती. जर लंडन उच्च न्यायालयाकडून त्याला अपील करण्यास परवानगी दिली गेली नसती तर पुढील काही दिवसातच त्याला भारताकडे सोपवले गेले असते. मात्र लंडन न्यायालयाच्या निर्णयाने त्याला दिलासा मिळाला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 29, 2019 1:01 pm