बँकांचे हजारो कोटी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात फरार झालेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने आता कर्ज फेडण्यासाठी संपत्ती विकण्याची तयारी दर्शवली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे कर्ज फेडण्यासाठी आपल्या कंपन्यांना १३,९०० कोटी रुपयांची संपत्ती विकण्याची परवानगी देण्यात यावी २२ जून रोजी कर्नाटक उच्च न्यायालयात आपण अशी याचिका दाखल केली आहे अशी माहिती विजय मल्ल्याने मंगळवारी दिली. या बँकांनी त्याला थकबाकीदार म्हणून घोषित केले आहे.

मल्ल्याला फारर आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करा आणि तात्काळ त्याची १२,५०० कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश द्यावे यासाठी ईडीने मुंबईतील विशेष कोर्टात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर तीन दिवसांनी आता विजय मल्ल्याने भारतीय बँकांचे कर्ज फेडण्याची तयारी दार्शवली आहे.

मल्ल्याने त्याच्या दिवाळखोरीत गेलेल्या किंगफिशर एअरलाईन्ससाठी १७ भारतीय बँकांकडून ९ हजार ९०० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. विजय मल्ल्या सध्या ब्रिटनमध्ये वास्तव्याला असून त्याला भारताच्या ताब्यात देण्यासंबंधी लंडनमधील न्यायालय ३१ जुलैला निकाल देण्याची शक्यता आहे.

मल्ल्याने कर्नाटक उच्च न्यायालयात केलेल्या याचिकेमध्ये ईडीने जप्त केलेली १,६००.४५ कोटींची स्थिर मालमत्ता, ७,६०९ कोटीचे शेअर्स, २१५ कोटीचे फिक्स डिपॉझिट, युनायटेड स्पिरिट लिमिटेडमधील २,८८८.१४ कोटीचे शेअर्स आणि अन्य मालमत्ता विकण्याची तयारी दर्शवली आहे.

कालच विजय मल्ल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लिहिलेलं आपलं पत्र सार्वजनिक करत आपली बाजू मांडली. विजय मल्ल्याने आपल्याला बँक घोटाळ्याचा पोस्टर बॉय करण्यात आल्याचंही म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये असलेल्या विजय मल्ल्याने ट्विटरच्या माध्यमातून आपली बाजू मांडताना सांगितलं आहे की, ‘मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री दोघांनाही १५ एप्रिल २०१६ रोजी पत्र लिहिलं होतं. आता सर्व गोष्टी योग्य पद्धतीने मांडण्यासाठी मी ही पत्रं सार्वजनिक करत आहे’. आपल्या पत्रावर कोणतीही प्रतिक्रिया मिळाली नाही, आणि आता आपण ते सार्वजनिक करत आहोत असं मल्ल्याने सांगितलं आहे.

मल्ल्याने म्हटलं आहे की, ‘नेते आणि मीडिया माझ्यावर अशा पद्धतीने आरोप करत आहे जणू काही मी नऊ हजार कोटींचं कर्ज घेऊन पसार झालो आहे. कर्ज देणाऱ्या काही बँकांना मला कर्जबुडव्याही घोषित केलं आहे’. विजय मल्ल्याने सीबीआयने सरकार आणि बँकांच्या सांगण्यावरुन आपल्याविरोधात खोटं आरोपपत्र दाखल करण्यात आल्याचाही आरोप केला आहे.