भारतात येण्याची आपली इच्छा असली तरी अधिकाऱ्यांनी पासपोर्ट रद्द केल्यामुळे आपण येऊ शकत नसल्याचे मद्यसम्राट विजय मल्या यांनी दिल्लीच्या एका न्यायालयाला सांगितल्यानंतर, त्यांची काही हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यासाठी तिसरा आदेश काढण्याची तयारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सुरू केली आहे.

मल्या यांच्याविरुद्ध सुरू करण्यात आलेल्या फौजदारी तपासाचा भाग म्हणून ईडीने यापूर्वीच त्यांच्या ८०४१ कोटी रुपयांची मालमत्तेवर टाच आणली असून, या वेळी त्यांच्या परदेशातील संपत्तीसह इतर मालमत्तेला हात लावण्याची ईडीची तयारी आहे.

सक्तवसुली संचालनालय आतापर्यंत आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कठोर तरतुदींनुसार मालमत्ता जप्त करत आलेले आहे, मात्र यानंतर मालमत्ता जप्त करण्याची कारवाई फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलमांन्वये केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

९ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या बँक कर्ज घोटाळ्यात साक्ष देण्यासाठी अनेकदा समन्स पाठवूनही मल्या हजर न झाल्यामुळे ईडीने न्यायालयात जाऊन त्यांना ‘फरार गुन्हेगार’ घोषित करणारा आदेश मिळवला होता.

आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक प्रकरणाच्या तपासात मल्या आतापर्यंत सहभागी न झाल्यामुळे, मल्या यांचा ‘प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष’ ताबा असलेल्या मालमत्ता जप्त करण्यासाठी तिसरा आदेश जारी करण्यात येईल.