News Flash

ट्रम्प यांचे Twitter Account कायमचे बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला

त्यांनी ट्विटरच्या या निर्णयासंदर्भात एक ट्विटही केलं आहे

(फोटो सौजन्य: Twitter/vijaya आणि रॉयटर्स)

अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचं सस्पेंड करण्यामागे भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक असणाऱ्या विजया गड्डे यांची महत्वाची भूमिका असल्याची माहिती समोर येत आहे. ४५ वर्षीय विजया या ट्विटरमध्ये मोठ्या पदावर कामाला असून ट्रम्प यांचे अकाऊंट बंद करण्यासाठी त्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगण्यात येते. शुक्रवारी ट्विटरने डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट पहिल्यांदा सस्पेंड केलं. मागील काही महिन्यांपासून ट्विटरने ट्रम्प यांच्या ट्विट्सवर आणि ट्विटर अकाऊंटवर विशेष लक्ष ठेवलं होतं. ट्रम्प यांचे अनेक ट्विट हे फ्लॅग म्हणजेच या ट्विटमधील दावा खरा आहेच असं नाही अशापद्धतीने मार्क केली जायची. मात्र शेवटी अमेरिकन संसदेमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर सोशल मीडिया कंपनीने ट्रम्प यांचे अकाऊंट कायमचं बंद करण्याचा निर्णय घेतला. ट्रम्प यांनी ट्विटरवरुन हिंसा करणाऱ्यांना पाठिंबा दिला आणि त्यांना हिंसेसाठी प्रोत्साहन दिल्याचं ट्विटरने म्हटलं होतं.

नक्की पाहा >> US Violence: अमेरिकन संसदेसमोर तिरंगा फडकावणारा सापडला; जाणून घ्या नक्की काय आहे त्याचं म्हणणं

ट्विटरच्या कायदेशीर, धोरणांविषय तज्ज्ञ आणि कंपनीच्या प्रोडक्टच्या सुरक्षा आणि विश्वासर्हतेशी संबंधित प्रमुख असणाऱ्या विजया यांनी ट्विटरवरुन कंपनीची भूमिका स्पष्ट केली आहे. “डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन अधिक हिंसा पसरवण्याची शक्यता असल्याने त्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आलं आहे. आम्ही आमची धोरणं, उद्दीष्ठ आणि सविस्तर विश्लेषण येथे देत आहोत. आमचा निर्णय कसा झाला त्यासंदर्भात तुम्ही येथे वाचू शकता,” असं म्हणतं विजया यांनी ट्विटरच्या नियमांसंदर्भातील एक लिंक शेअर केली आहे.

कोण आहेत विजया?

भारतामध्ये जन्म झालेल्या विजया या अगदी लहान असतानाच आपल्या कुटुंबासोबत अमेरिकेत स्थायिक झाल्या. त्यांचे संपूर्ण बालपण टेक्सासमध्येच केलं. त्याचे वडील मेक्सिकोच्या आखातामध्ये असणाऱ्या तेल शुद्धिकरण प्रकल्पामध्ये केमिकल इंजिनियर म्हणून कार्यरत होते. विजया वयाने मोठ्या झाल्या तोपर्यंत त्यांचे कुटुंब अमेरिकेच्या पूर्व समुद्र किनाऱ्याजवळच्या प्रदेशात स्थायिक झालं. न्यू जर्सीमध्ये विजया यांनी आपलं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं.

आणखी वाचा- ट्रम्प यांच्यावरील ‘ती’ कारवाई पंतप्रधान मोदींच्या पथ्यावर, झाला मोठा फायदा

ट्विटरसोबतचा प्रवास

कॉर्नेल विद्यापीठ आणि न्यूयॉर्क विद्यापिठामधून विजया यांनी कायदा विषयामध्ये पदवीचे शिक्षण घेतले. त्यानंतर विजया यांनी दहा वर्ष एका कायदेशीर सल्लागार म्हणून खासगी कंपनीसोबत काम केलं. अनेक स्टार्टअप कंपन्यांना कायदेशीर मार्गदर्शन करण्याचं काम ही कंपनी करायची. २०११ साली विजया यांचा ट्विटरसोबतचा प्रवास सुरु झाला. कॉर्परेट वकील म्हणून विजया या अगदी सुरुवातीपासूनच पडद्यामागून काम करायच्या. ट्विटरसंदर्भात अनेक कायदेशीर प्रकरणांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. मात्र मागील दशकभरामध्ये त्यांनी ट्विटरच्या धोरणांनी कायद्याशी सांगड घालून दिली.

…आणि विजया यांचं नाव चर्चेत आलं

जागतिक स्तरावर ट्विटरचं महत्व वाढत गेलं त्यानुसार विजया या पडद्यामागून थेट बातम्यांमध्ये झळकू लागल्या. ‘फॉर्च्यून’च्या एका अहवालाच्या हवाल्याने एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार मागील वर्षी ट्विटरचे सह-संस्थापक आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी असणाऱ्या जॅक डोर्सी हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट गेण्यासाठी ओव्हल ऑफिसमध्ये गेले होते तेव्हा विजया त्यांच्या सोबत होत्या. त्याशिवाय सन २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत डोर्सी यांची जी बैठक झाली होती तेव्हाही विजया उपस्थित होत्या.

भारत दौऱ्यादरम्यान डोर्सी यांनी दलाई लामा यांची भेट घेतली त्यावेळीही विजया उपस्थित होत्या. त्यांनीच यासंदर्भातील फोटो ट्विटरवरुन शेअर केला होता.

आता ट्रम्प यांचं अकाऊंट कायमचं बंद करण्याच्या निर्णयामुळे विजया पुन्हा चर्चेत आल्यात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 11, 2021 8:11 am

Web Title: vijaya gadde played main role in suspending donald trumps twitter account scsg 91
Next Stories
1 हरियाणात शेतकऱ्यांचा उद्रेक
2 करोना काळात महाराष्ट्रात सर्वाधिक जैववैद्यकीय कचरा
3 २० लाख अपात्र लाभार्थ्यांना १३४४ कोटी
Just Now!
X