कानपूर चकमकीतील आरोपी विकास दुबे घटनेपासून फरार असून, उत्तर प्रदेश पोलीस सध्या त्याचा सर्वत्र शोध घेत आहे. मात्र, विकास दुबेचा अजूनही पोलिसांना थांगपत्ता लागलेला नाही. दुसरीकडे कानपूर चकमक आणि विकास दुबे या मुद्यावरून उत्तर प्रदेशातील राजकारण तापलं आहे. काँग्रेस, समाजवादी पार्टीकडून योगी आदित्यनाथ यांच्यावर टीकास्त्र सोडलं जात असून, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी विकासाच्या मुद्यावरून भाजपाला टोला लगावला आहे.

कानपूर चकमक प्रकरणातील आरोपी विकास दुबे अद्यापही फरार आहे. त्यांच्या शोधासाठी उत्तर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापेमारी केली. मात्र, विकास दुबे पोलिसांच्या हाताला लागलेला नाही. या प्रकरणाची स्पेशल टास्क फोर्स चौकशी करत आहे. दरम्यान, विकास दुबे पकडण्यात अजूनही यश न आल्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सरकारवर टीका केली आहे. “आता तर विकास स्वतःच विचारतोय, ‘विकास’ला कधी अटक करणार… करणार की नाही? तसं तर नावं बदलणाऱ्या उत्तर प्रदेश सरकारकडे आणखी एक पर्याय आहे. दुसऱ्या कुणाचं नाव बदलून विकास ठेवायचं आणि नंतर… आणखी काय बोलायचं… जनता समजदार आहे,” असा टोला अखिलेश यादव यांनी लगावला आहे.

चकमक प्रकरणात मोठी कारवाई

विकास दुबेशी असलेल्या संबंधांप्रकरणी कानपूर पोलिसांनी बुधवारी चौबेपूर पोलीस ठाण्याचे एसएचओ विनय तिवारी आणि उप निरीक्षक के.के.शर्मा या दोघांना अटक केली. आज सकाळीच उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने हमिदपूर जिल्ह्यात चकमकीत विकास दुबेचा जवळचा सहकारी अमर दुबेला ठार केलं. या हत्याकांडानंतर तिवारी आणि शर्मा दोघांना निलंबित करण्यात आले होते. शुक्रवारी मध्यरात्री विकास दुबेच्या ठिकाणावर छापा मारण्यात येणार होता. पण त्याआधीच त्याला माहिती मिळाली होती.