कानपूरमधील बिक्रू खेड्यात विकास दुबे याच्या टोळीवर जो छापा टाकताना झालेल्या चकमकीत पोलीस उपअधीक्षकासह आठ पोलिसांना जीव गमावावा लागला आहे. सध्या उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबेचा शोध घेत आहेत. उत्तर प्रदेशमधील DGP हितेश चंद्रा यांनी हाय अलर्ट घोषीत केला असून ७५ जिल्ह्यामध्ये सर्च ऑपरेशन आणि छापेमारी सुरू केली आहे. विकास दुबेला पकडण्यासाठी तीन हजार पोलिसांच्या ५० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप विकास दुबे पोलिसांना सापडला नाही. पोलिसांच्या निशाण्यावर असलेला विकास दुबे उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा सील करण्यापूर्वी फरार झाल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.

विकास दुबे याच्या मोबाइलची शेवटची लोकेशन मध्यप्रदेशमधील औरेया जिल्ह्यातील आहे. असा संशय व्यक्त करण्यात येत आहे की, विकास दुबे इटवा आणि झांसीच्या मार्गाने मध्य प्रदेशमध्ये गेला असेल. एका पोलिस आधिकाऱ्यानं असाही संशय व्यक्त केलाय की, उत्तर प्रदेश राज्याच्या सीमा बंद करण्यापूर्वीच शुक्रवारी विकास दुबे फरार झाला असेल. पोलिसांच्या मृत्यूनंतर तब्बल सहा तासांनी विकास दुबेच्या गाडीचा शोध सुरू झाला होता. राज्यातून बाहेर जाण्यासाठी विकास दुबेला इतका वेळ पुरेसा होता. विकास दुबे मध्य प्रदेशनंतर दुसऱ्या राज्यातही फरार झालेला असू शकतो.

आणखी वाचा – युपीतील पोलीस हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे भाजपात होता का?; नेमकं सत्य काय?

पोलीस महानिरीक्षक अगरवाल यांनी सांगितले की, दुबे याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास एक लाख रुपये बक्षीस दिलं जाईल. निलंबित पोलीस अधिकारी तिवारी याला ताब्यात घेतले नसून त्याची चौकशी सुरू आहे. जर काही पुरावे आढळले तर त्याला अटक करण्यात येईल. दुबे याचे घर शनिवारी पाडून टाकल्याच्या कारवाईबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, दुबे याने घरात शस्त्रास्त्रे व दारुगोळा खंदकात भरून ठेवला होता. शस्त्रास्त्रे शोधण्यासाठी भिंती तोडाव्या लागल्या त्यामुळे छप्पर कोसळले. तेथे मोठय़ा प्रमाणात दारुगोळा सापडला आहे.

विकास दुबे आहे, तरी कोण?

राजकीय नेत्यांसोबत उठबस असलेल्या विकास दुबेविषयी ‘बीबीसी हिंदी’नं खास रिपोर्ट तयार केला आहे. आठ पोलिसांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या विकास दुबेवर चौबेपूर पोलीस ठाण्यात ६० गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. या गुन्ह्यांमध्ये खून व खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे. अशाच एका खून प्रकरणात पोलीस विकास दुबेला अटक करायला गेले होते आणि त्यानंतर ही घटना घडली.