जेएनयूमधील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ दोन दिवसांपासून आंदोलनं केली जात आहे. यातच देशातील कामगार संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदवर राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर ट्विट करून टीका केली होती. त्यावर सॅक्रेड गेम्सचा दिग्ददर्शक विक्रमादित्य मोटवानी राहुल गांधींना खरमरीत टोला लगावला आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात शनिवारी रात्री तोंड बांधून आलेल्या काही गुंडांनी विद्यापीठ परिसरात घुसून विद्यार्थ्यांवर हल्ला केला. लोखंडी सळ्या आणि काठ्यांनी विद्यार्थी, प्राध्यापकांना मारहाण करण्यात आली. या घटनेनंतर सर्वत्र निषेधाचे सूर उमटले. त्यातच बुधवारी देशातील कामगार संघटनांनी देशव्यापी बंदची हाक दिली.
भारत बंदसंदर्भात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सरकारवर टीका करणारं ट्विट केलं. मोदी-शाह यांचं सरकार लोकांच्या विरोधात आहे. कामगार विरोधी धोरणांमुळे देशात बेरोजगारी वाढली आहे. सरकार कंपन्या मोडकळीस आणून त्यांच्या मित्र असलेल्या उद्योगपतींना विकत आहे. आज २५ कोटी कामगार संपावर आहे. त्यांना माझा सलाम,” असं राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
राहुल गांधी यांचं ट्विट रिट्विट करीत सॅक्रेड गेम्सचा दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीनं राहुल गांधींचा खडेबोल सुनावले आहे. “भावा, तू कुठे आहेस?” असा उपरोधिक सवाल करत राहुल गांधींवर टीका केली आहे.

राहुल गांधींना असा प्रश्न विचारण्याचं कारण-

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रे गेली. दरम्यान, गेल्या काही काळात देशात सातत्यानं आंदोलन होत आहे. या आंदोलनादरम्यान कुठेही राहुल गांधी दिसले नाही. दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील हल्ल्यानंतर राहुल गांधी दक्षिण कोरियाच्या दौऱ्यावर होते. तर जेएनयूतील घटनेनंतरही राहुल गांधी कुठेही दिसले नाही. त्यामुळे विक्रमादित्य मोटवानी यांने असा प्रश्न केला असावा.