बिबट्याने सात वर्षाच्या चिमुरड्याची शिकार केल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या आठ एक जमिनीवर आग लावून टाकल्याची घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील बागेश्वर जिल्ह्यात असलेल्या हरिनागरी गावात ही घटना घडली आहे. बिबट्याने हल्ला केल्याची ही तीन महिन्यातील दुसरी घटना असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सोमवारी संध्याकाळी चिमुरडा शौचासाठी घराबाहेर गेला होता त्यावेळी बिबट्याने हा हल्ला केला. हल्ला झाला तेव्हा त्याची आई स्वयंपाकघरात होती अशी माहिती मुख्य वनसंरक्षक बी पी गुप्ता यांनी दिली आहे. जंगलाच्या शेजारी अनेक घरं असून बिबट्याने चिमुरड्याला ओढत जंगलात नेलं होतं. गावकऱ्यांनी शोध घेतला असता २५० मीटर अंतरावर त्यांना चिमुरड्याचा मृतदेह आढळला.

‘यानंतर जवळपास ४ हजार ते ५ हजार संतप्त गावकऱ्यांनी वनविभागाच्या आठ एकर जमिनीवर आग लावून दिली’, अशी महिती विभागीय वन अधिकारी आर के सिंह यांनी दिली आहे. आगीवर नियंत्रण आणणं कठीण होतं कारण गावकऱ्यांनी बाहेरील एकाही व्यक्तीला आग सुरु असताना तिथे प्रवेश करु दिला नाही असंही त्यांनी सांगितलं.

गावकऱ्यांनी याच बिबट्याने मार्च महिन्यात एका चार वर्षाच्या चिमुरड्याची शिकार केल्याचं सांगितलं आहे. ही दुसरी घटना असल्या कारणाने गावकरी संतप्त झाले असून बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळू नये यासाठी त्यांनी जंगलाला आग लावली अशी माहिती अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान बिबट्याला नरभक्षक घोषित करण्यात आलं असून ठार करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.