छत्तीसगडमधील आदिवासी बहुल जसपूर जिल्ह्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील बग्गाबाहार गावामध्ये दोन जणांना वीज पडल्यानंतर गावकऱ्यांनी केलेल्या विचित्र उपायामुळे मृत्यू झाला आहे. वीज पडल्यानंतर जखमी झालेल्या तीन जणांना गावकऱ्यांनी उपचार म्हणून चक्क शेणाच्या ढीगाऱ्यामध्ये गाडलं. यामुळेही काही न झाल्याने या तिघांना रुग्णालयामध्ये नेण्यात आलं. मात्र तोपर्यंत दोघांचा मृत्यू झाला होता. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रविवारी संध्याकाळी बग्गारबाहार गावातील काही ग्रामस्थ शेतात काम करत असतानाच अचानक वीज पडली. यामध्ये तीन जण जखमी झाले. यात दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश होता. मात्र जखमी झालेल्या या तिघांना तातडीने रुग्णालयात न नेता त्यांच्यावरीली विजेचा प्रभाव कमी करण्यासाठी गावकऱ्यांनी या तिघांना शेणाच्या ढीगाऱ्यामध्ये गाडलं. या तिघांच्याही प्रकृतीमध्ये काही सुधारणा न झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र तिथे पोहचल्यानंतर डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केलं. जसपूरचे सब डिव्हीजनल ऑफिसर राजेंद्र परिहार यांनी राजधानी रायपूरपासून ४०० किमी अंतरावर घडलेल्या या घटनेला दुजोरा दिल्याचे पीटीआयने म्हटलं आहे.

जोरात पाऊस पडू लागल्यानंतर शेतात काम करणारे काहीजण बांधावरील एका छोट्या झाडाखाली थांबले. त्याचवेळी त्या झाडावर वीज पडली आणि तिघांना गंभीर दुखापत झाली. या तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्याऐवजी त्यांच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी या तिघांना पायापासून मानेपर्यंत शेणाच्या ढिगाऱ्यात गाडलं. हा आदिवासी पाड्यांचा भाग असून वीज पडल्यानंतर शेणाचा वापर करुन तिचा प्रभाव कमी करता येतो अशी अंधश्रद्धा येथील लोकांमध्ये आहे. विजेमुळे होणाऱ्या जखमा ठीक करण्यासाठी शेणाचा वापर केल्यास फायद्याचे ठरते असं येथील लोकं मानतात असंही पोलिसांनी सांगितलं.

एका व्यक्तीच्या मध्यस्थीनंतर या तिघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तोपर्यंत सुनिल साई (२२) आणि चंपा राऊत (२०) या दोघांचा मृत्यू झाला. गुदमरल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. तर तिसरा २३ वर्षीय तरुण रुग्णालयामध्ये उपचार घेत आहे. या प्रकरणात पोलीस अधिक तपास करत आहेत.