‘चाय पे चर्चा’ला उत्तर देण्यासाठी काँग्रेसकडून उत्तर प्रदेशमध्ये सुरू झालेला ‘खाट सभा’ कार्यक्रम मंगळवारी वेगळ्याच गोष्टीमुळे चर्चेत आला. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देवरियापासून २५०० किलोमीटरच्या किसान यात्रेला सुरुवात केली. याच यात्रेदरम्यान रुद्रपूरमध्ये त्यांची ‘खाट सभा’ झाल्यानंतर लोकांनी कार्यक्रम संपल्यावर थेट खाटा घरी नेण्यासच सुरुवात केली. काहींनी डोक्यावरून तर काहींनी खाटांचे पाय तोडून त्या घरी नेल्या. स्थानिकांनी अचानकपणे घेतलेला हा पवित्रा पाहून आयोजकही आश्चर्यचकीत झाले. विशेष म्हणजे या सर्व खाटा ‘खाट सभे’साठी दिल्लीहून मागविण्यात आल्या होत्या. आता त्या लोकांनी घरी नेल्यामुळे काँग्रेसच पक्षच अडचणीत सापडला आहे.
रुद्रपूरमधील ‘खाट सभा’ कार्यक्रमासाठी एकूण दोन हजार खाटा मागविण्यात आल्या होत्या. राहुल गांधी यांचे भाषण संपल्यावर ते तिथून निघून जात असतानाच उपस्थितांनी खाटा पळवून नेण्यास सुरुवात केली. काही लोकांत खाटा पळवताना वादावादी झाल्याचेही पाहायला मिळाले. वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामननी लोकांना खाटा घेऊन कुठे चाललाय, असा प्रश्न विचारल्यावर लोकांनी घरी घेऊन जात असल्याचेही बिनधास्त सांगितले. काहींना तर खाटा उचलून नेण्यास त्रास झाल्यावर खाटांचे पायच तोडले आणि उरलेला वरचा भाग घेऊन ते तिथून निघून गेले.
काँग्रेसचे निवडणूक सल्लागार प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासाठी ‘खाट सभा’ या प्रचार अभियानाचे नियोजन केले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधी हे लोकांची भेट घेतील त्यांच्याशी खाटेवर बसून चर्चा करतील असे नियोजन प्रशांत किशोर यांनी केले आहे. पण आज झालेल्या या प्रकारामुळे हा कार्यक्रम वेगळ्या गोष्टीने चर्चेत आला.