राम मंदिर आंदोलनाशी निगडीत भाजपाचे पाच वेळचे खासदार विनय कटियार यांचे राज्यसभेचे तिकीट यंदा कापण्यात आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिरप्रश्नी आंदोलन जिवंत ठेवण्यात कटियार यांची महत्वाची भूमिका आहे. सन १९८४ मध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपा दोन लोकसभा मतदारसंघावरून १९८९ मध्ये ८५ जागांवर पोहोचवण्यामध्ये त्यांचेही मोलाचे योगदान आहे. पण यंदा उत्तर प्रदेशमधून रिकाम्या झालेल्या राज्यसभेच्या १० जागांसाठी भाजपाने त्यांना उमेदवारी दिली नाही. कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ सहकाऱ्यांना यावेळी प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे कटियार समर्थकांमध्ये आता चर्चा रंगली आहे. राम मंदिर निर्मितीसाठी नरेंद्र मोदींवर दबाव आणणे आणि अडवाणी यांना पाठिंबा देण्याची किंमत कटियार यांना चुकवावी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय दबक्या आवाजात म्हणत आहेत.

ज्या आठ नेत्यांना भाजपा उत्तर प्रदेशमधून राज्यसभेवर पाठवत आहे, ते सर्व कटियार यांच्यापेक्षा कनिष्ठ आहेत. यामध्ये अरूण जेटली, विजयपालसिंह तोमर, सकलदीप राजभर, कांता कर्दम, अनिल जैन, जीव्हीएल नरसिम्हा राव, हरनाथसिंह यादव, अशोक वाजपेयी. जेटली आणि राव हे राष्ट्रीय स्तरावरील चर्चित नेते आहेत. तर अशोक वाजपेयी हे समाजवादी पक्ष सोडून भाजपात आले आहेत. उर्वरित पाच नेते हे उत्तर प्रदेशमध्येच जास्त परिचित नाहीत.

विनय कटियार २००६ पासून राज्यसभा सदस्य आहेत. दि. २ एप्रिल रोजी त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. यापूर्वी फैजाबाद मतदारसंघातून ते तीन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहेत. परंतु, यंदा पक्षाने तिकीट कापल्यामुळे २७ वर्षांत पहिल्यांदाच ते संसदेत प्रवेश करणार नाहीत. अनेक प्रकरणांमध्ये त्यांच्या वक्तव्यामुळे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये ते नावडते बनल्याची चर्चा आहे.

राष्ट्रपती निवडणुकीच्या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठीच अडवाणी यांची चौकशी करण्याचे सर्वोच्च न्यायालयात अपील करण्यात आल्याचा आरोप लालूप्रसाद यादव यांनी केला होता. कटियार यांनी सार्वजनिकरत्या लालूंच्या या आरोपाचे समर्थन केले होते. कटियार हे १९७० मध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाशी जोडले गेले. १९८४ मध्ये त्यांनी बजरंग दलाची स्थापना केली. कटियार हे उत्तर प्रदेशमधील ओबीसी समाजाचा चेहरा आहेत.