29 May 2020

News Flash

टाळेबंदीचा भंग फौजदारी गुन्हा!

सक्त अंमलबजावणीचा केंद्राचा आदेश

संग्रहित छायाचित्र

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या देशव्यापी टाळेबंदीचा भंग करणाऱ्या व्यक्तींविरोधात कडक कारवाई करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, असा आदेश केंद्राने गुरुवारी राज्य सरकारांना दिला आहे. केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी राज्यांना मुख्य सचिवांना यासंबंधी आदेशपत्र पाठवले आहे.

दिल्लीतील मर्कज निजामुद्दीनमधील घटनेनंतर, तसेच विविध राज्यांमध्ये अजूनही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत असल्यामुळे टाळेबंदीची सक्त अंमलबजावणी करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेत टाळेबंदी काटेकोरपणे लागू करण्याची विनंती केली.

तबलिगी जमातमध्ये सहभागी ९ हजारांचे विलगीकरण

‘मर्कज निजामुद्दीन’मधील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगी जमातच्या ९ हजार अनुयायांचे देशभरात विविध राज्यांमध्ये विलगीकरण करण्यात आले. त्यात १,३०६ परदेशी नागरिक असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गुरुवारी देण्यात आली. मर्कजमधील अनुयायी वाढत्या करोना रुग्णांचा प्रमुख स्रोत बनल्यामुळे केंद्र सरकारने सर्व राज्यांना या अनुयायांसाठी शोधमोहीम राबवण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर आतापर्यंत नऊ  हजार तबलिगी जमातचे कार्यकर्ते, त्यांच्याशी निगडित व्यक्ती आणि त्यांची ठिकाणे शोधून काढण्यात राज्यांना यश आले.

दिल्लीत सुमारे २ हजार अनुयायी होते. त्यापैकी १५० परदेशी नागरिक होते. दिल्लीत १८०४ अनुयायांना विलगीकरण कक्षांत ठेवण्यात आले आहे. ३३४ संशयित रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे केंद्रीय गृह संयुक्त सचिव पुण्यसलिल श्रीवास्तव यांनी सांगितले.

९ धर्मगुरुंविरुद्ध गुन्हा

नवी दिल्लीतील निझामुद्दीन येथे गेल्या महिन्यात झालेल्या तबलिगी जमातच्या धार्मिक मेळाव्यात सहभागी होऊन परतलेल्या आणि नेपाळच्या सीमेवरील एका मदरशात लपून बसलेल्या नऊ  धर्मगुरूंविरुद्ध पोलिसांनी गुरुवारी एफआयआर दाखल केला.

लोकसेवकाने ठरवून दिलेल्या कर्तव्याचा अनादर करणे, प्राणघातक रोगाचा संसर्ग पसरू शकेल असे निष्काळजी कृत्य करणे आणि रोगाचा फैलाव करू शकणारे मारक कृत्य अशा आरोपांखाली या लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमरोहा येथील रहिवासी असलेले नऊ मौलाना पोलिसांना बुधवारी महिपूर भागातील जमुनाहा वस्तीतील एका मदरशात लपून असलेले आढळले. ते १३ मार्चला येथे आले आणि एका मशिदीतही थांबले होते, असे पोलीस अधीक्षक अनुप कुमार यांनी सांगितले.

या लोकांनी त्यांच्या वास्तव्याबाबत प्रशासनाला माहिती दिली नाही, किंवा स्वत:हून वैद्यकीय तपासणीही करून घेतली नाही. त्यांना मदरशातच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली.

‘मर्कज’मुळे ९ राज्यांत ४०० बाधित : तेलंगणामुळे मर्कजमधील बाधित रुग्णांची माहिती उघड झाली. त्यानंतर मर्कजमधून अनुयायी आंध्र प्रदेश, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, दिल्ली, अंदमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, पुडुचेरी, राजस्थान आणि आसाम या राज्यांत प्रामुख्याने गेले. तिथे त्यांचा शोध घेण्यात आला असून आतापर्यंत मर्कजमधील कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी  ४०० अनुयायी करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तमिळनाडू १७३, राजस्थान ११, अंदमान ९, दिल्ली ४७, पुडुचेरी २, जम्मू-काश्मीर २२, तेलंगणा ३३, आंध्र प्रदेश ६७ आणि आसाम १६ रुग्ण आढळले आहेत. येत्या दिवसांमध्ये आणखीही रुग्ण सापडण्याची शक्यता असल्याचे अगरवाल यांनी सांगितले.

आदेशात काय?

* टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्या आणि खोटे दावे करणाऱ्या लोकांविरुद्ध भारतीय दंड विधानातील, तसेच आपदा व्यवस्थापन कायदा २००५ मधील सुयोग्य तरतुदींनुसार गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश केंद्र सरकारने गुरुवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिले.

* ‘करोनाला आळा घालण्यासाठीच्या उपाययोजनांचे उल्लंघन करणारी कुठलीही व्यक्ती आपदा व्यवस्थापन कायदा २००५ च्या कलम ५१ ते ६० नुसार, तसेच भादंविच्या कलम १८८ अन्वये कायदेशीर कारवाईस पात्र राहील’ असे २४ मार्चला जारी केलेल्या टाळेबंदीच्या उपाययोजनांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे, असे केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

* आपदा व्यवस्थापन कायदा आणि भारतीय दंड विधान यांच्यातील दंडात्मक तरतुदी यांचा सरकारी अधिकारी आणि नागरिक यांच्या माहितीसाठी व्यापक प्रचार करावा, तसेच कायद्याची अंमलबजावणी करणारे अधिकारी टाळेबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर त्यांतील सुयोग्य तरतुदीनुसार कारवाई करतील, हेही सांगितले जावे, असेही भल्ला म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:40 am

Web Title: violation of lockdown is a criminal offense abn 97
Next Stories
1 एम्समधील एका वरिष्ठ डॉक्टरला करोनाची बाधा
2 जगभरातील करोनाबाधितांची संख्या १० लाखांनजीक
3 डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना अटक
Just Now!
X