पक्षाने आदेश दिल्यास पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्याची तयारी राहुल गांधी यांनी पहिल्यांदाच दर्शवली आहे. याआधी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. मात्र काँग्रेसने राहुल यांच्या नावाची घोषणा पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून केली नव्हती. याविषयी राहुल गांधींनीदेखील कोणतेही भाष्य केले नव्हते. मात्र अमेरिकेत बोलताना त्यांनी प्रथमच पंतप्रधानपदाचा उमेदवार होण्यास तयार असल्याचे म्हटले.

नोटाबंदी, वाढता हिंसाचार, जीएसटी यासह अनेक मुद्द्यांवरुन काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. ‘हिंसा, द्वेष आणि ध्रुवीकरणाचे राजकारण यांनी भारतात डोके वर काढले आहे. हे मुद्दे देशासाठी नवे असून, हाच ‘न्यू इंडिया’ आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींवर शरसंधान साधले. ते अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील बर्कलेमध्ये बोलत होते.

नोटाबंदीचा निर्णय, कथित गोरक्षकांकडून सुरु असलेला हिंसाचार, द्वेषाचे राजकारण अशा अनेक मुद्यांवरुन राहुल गांधींनी मोदी सरकारला लक्ष्य केले. ‘राजकारणातील ध्रुवीकरण अतिशय धोकादायक आहे. द्वेष, राग आणि हिंसा सगळ्यांनाच उद्ध्वस्त करेल. देशातील उदारमतवादी पत्रकारांच्या हत्या होत आहेत. सामान्य लोकांवर हल्ले केले जात असून दलितांना गायींची तस्करी केल्याच्या केवळ संशयावरुन संपवले जात आहे. गोमांस सेवन केल्याच्या संशयावरुन मुस्लिमांच्या हत्या सुरु आहेत. हे सर्वकाही ‘न्यू इंडिया’मध्ये सुरू आहे,’ अशा शब्दांमध्ये राहुल यांनी मोदींच्या ‘न्यू इंडिया’ अभियानावर निशाणा साधला.

‘हिंसाचाराच्या घटना आता मुख्य प्रवाहाचा भाग झाल्या आहेत आणि हा प्रकार अतिशय भयंकर आहे. अहिंसेच्या विचारांवरच हल्ले सुरु आहेत. अहिंसेमुळेच मानवता जिवंत राहू शकते. मात्र त्याच विचारधारेला लक्ष्य केले जात आहे,’ असा शब्दांमध्ये त्यांनी देशातील स्थितीवर भाष्य केले. यावेळी त्यांनी नोटाबंदीच्या निर्णयावर टीकेची झोड उठवली. ‘मोदींनी संसद, मुख्य आर्थिक सल्लागार यापैकी कोणाचाही सल्ला न घेता, त्यांच्याशी कोणतीही चर्चा न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयाची किंमत देशाला चुकवावी लागली. सकल राष्ट्रीय उत्पादनात २ टक्क्यांची घट झाली,’ असे त्यांनी म्हटले.

लोकांसोबतच संवाद कमी होत गेल्यानेच काँग्रेसला पराभव पत्करावा लागला, असे मतही राहुल गांधींनी व्यक्त केले. ‘२०१२ च्या सुमारास पक्षात अहंकार निर्माण झाला. त्यामुळे आम्ही लोकांसोबत संवाद साधणेच बंद केले,’ असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. देशातील तरुणांना रोजगाराची आवश्यकता असल्याचेही त्यांनी म्हटले. रोजगार निर्मितीत केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीकाही त्यांनी केली.