News Flash

काश्मीरमधील आणखी तीन जिल्ह्य़ांमध्ये संचारबंदी

जम्मूतील आणखी तीन तणावग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराने रविवारी ध्वजसंचलनही केले

| August 12, 2013 05:00 am

जम्मूतील आणखी तीन तणावग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराने रविवारी ध्वजसंचलनही केले. हिंसाचारग्रस्त किश्तवार जिल्ह्य़ात जम्मू-काश्मीर सरकारने राजकारण्यांना येण्यास बंदी घातल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना विमानतळावरच स्थानबद्ध करून नंतर माघारी पाठविण्यात आले.
किश्तवार जिल्ह्य़ात आणखी एकाचा मृतदेह आढळल्यानंतर शुक्रवारपासून सुरू असलेला जातीय तणाव सलग तिसऱ्या दिवशी कायम असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारच्या हिंसाचारात दोन जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते. शनिवारी रात्री लुटालूट आणि हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे जम्मू आणि राजौरी जिल्ह्य़ांत संचारबंदी लागू करून काही भागांत लष्करासही पाचारण करण्यात आले. ही संचारबंदी रविवारी उधमपूर, संबा आणि कथुआ जिल्ह्यांतही लागू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अरुण जेटली हे किश्तवार येथे जाण्यासाठी आले असता जम्मू विमानतळावर त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. या कारवाईबद्दल भाजपच्या नेत्यांनी संताप व्यक्त करून त्यास लोकशाहीविरोधी अशी टीका केली. पंजाबमधील भाजपचे राज्यसभा सदस्य अविनाश राय खन्ना हेही जेटली यांच्यासमवेत किश्तवार येथे जाणार होते. मात्र त्यांनाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष जुगल किशोर यांच्यासह स्थानबद्ध करण्यात आले. जुगल किशोर हे सकाळी कथुआ येथे जाण्याचा प्रयत्न करीत होते.
जम्मूमधील हिंसाचारग्रस्त भागांत आपण जाण्याच्या तयारीत असताना श्रीनगर येथील निवासस्थान सोडण्यास आपल्याला प्रतिबंध करण्यात आल्याचा आरोप पीडीपीच्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2013 5:00 am

Web Title: violence continues in jammu curfew clamped in three more districts
Next Stories
1 भाजपचे नेते किश्तवारमधील परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत -ओमर अब्दुल्ला
2 मोदी यांची सरदार पटेल यांच्याशी तुलना
3 देशभरातील वाघांच्या संख्येत झपाटय़ाने घट
Just Now!
X