काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही. नारायणसामी यांची शनिवारी पुडुचेरी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे ते पुडुचेरी नवे मुख्यमंत्री होणार आहेत. दरम्यान, नारायणसामी यांची नेतेपदी निवडण झाल्यानने काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाटय़ावर आली आहे. नारायणसामी यांच्या विरोधातील गटाने याचा निषेध केला असून अनेक बसगाडय़ांची मोडतोड केली आहे.
पुम्डुचेरी आणि चेन्नई या दरम्यान धावणाऱ्या आठ बसगाडय़ांच्या काचा फोडण्यात आल्या. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ए. नमस्सीवयम यांच्या समर्थकांनी बसगाडय़ांवर दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे. या दगडफेकीत बसचालक जखमी झाला आहे. काचा फुटल्याने काही प्रवासीही जखमी झाले आहेत.
काँग्रेस विधिमंडळ पक्षाची ज्या हॉटेलमध्ये बैठक सुरू होती तेथेही नारायणसामी यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. ज्या व्यक्तीने निवडणूक लढविली नाही त्याला मुख्यमंत्री करण्यात येऊ नये असे निदर्शकांचे म्हणणे होते.
रंगास्वामी यांच्या पक्षाचा पराभव करत पुदुच्चेरीत काँग्रेस व द्रमुक आघाडीने सत्ता खेचून आणली आहे. ३० पैकी आघाडीकडे एकूण १७ जागांसह बहुमत आहे.