नवी दिल्ली / गुवाहाटी : नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात ईशान्य भारतात असंतोषाचा भडका उडाला आहे. या विधेयकाविरोधातील आंदोलन तीव्र करत आसाम, त्रिपुरासह ईशान्येकडील राज्यांत लोक बुधवारी रस्त्यावर उतरले.

आसाममध्ये काही भागांत जाळपोळ झाली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच गुवाहाटी प्रशासनाने गुरुवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली. तसेच आसामच्या लखीमपूरसह अनेक जिल्ह्यांत बुधवारी सायंकाळी ७ ते गुरुवारी सायंकाळी ७ पर्यंत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली.

त्रिपुरामध्ये पोलिसांसह जवानांच्या तुकडय़ा तैनात करण्यात आल्या आहेत. ईशान्येतील राज्यांमध्ये निमलष्करी दलाच्या पाच हजार जवानांना पाचारण करण्यात आले आहे. त्यातील दोन हजार जवान काश्मीरमधून, तर तीन हजार जवान देशातील इतर भागांतून ईशान्येकडील राज्यांत पाठविण्यात आल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले. ईशान्येतील नागरिकांच्या दिल्लीतील संघटनांनी बुधवारी जंतरमंतर येथे आंदोलन करून या विधेयकाचा निषेध केला.