News Flash

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार

द्रीय सशस्त्र पोलिसांच्या जादा ७१ तुकडय़ा  पाठविण्याचा आदेशही आयोगाने केंद्रीय गृह विभागाला दिला आहे.

मतदानावेळी ‘सीआयएसएफ’चा गोळीबार; चौघांचा मृत्यू

भाजपने प्रतिष्ठा पणाला लावलेल्या आणि सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने अस्तित्वाची लढाई केलेल्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत शनिवारी चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना हिंसाचाराचा उद्रेक झाला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार, तर गोळीबाराच्या दुसऱ्या घटनेत एक मतदार ठार झाला.

कुचबिहार जिल्ह्य़ातील सितलकुची भागातील एका केंद्रावर मतदान सुरू असताना औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांनी नागरिकांच्या कथित हल्ल्यापासून स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात चार नागरिक ठार झाले, तर दुसऱ्या एका घटनेत, सितलकुचीतीलच पठानटुली मतदान केंद्राबाहेर सत्ताधारी तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यात आनंद बर्मन नावाच्या १८ वर्षांच्या मतदाराला गोळ्या घालण्यात आल्या. गोळीबाराच्या घटनेमुळे सितलकुची भागातील १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील मतदान प्रक्रिया रद्द करून तेथे फेरमतदान घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने जाहीर केला.

कुचबिहारमध्ये जाण्यासाठी सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुढील ७२ तास बंदी असेल, असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे तेथे केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या जादा ७१ तुकडय़ा  पाठविण्याचा आदेशही आयोगाने केंद्रीय गृह विभागाला दिला आहे.

या हिंसाचाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केले, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी, गोळीबारास केंद्रीय संरक्षण दल जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.

तृणमूल काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात सितलकुची भागातील माथाभंगा येथे चकमक झाली. त्या वेळी मतदान सुरू होते. काही लोकांनी औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) जवानांना मतदान केंद्राबाहेर घेराव घालून त्यांच्या बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘सीआयएसएफ’ने स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात चार जण ठार झाले, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. या कथित स्वसंरक्षणाच्या ‘सीआयएसएफ’च्या दाव्याबद्दल तृणमूल काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. दुसऱ्या घटनेत सकाळी एका मतदाराची अनोळखी व्यक्तींनी सितलकुचीमध्ये हत्या केली.

सितलकुची भागातील लोकांनी ‘सीआयएसएफ’च्या जवानांकडील बंदुका हिसकावण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यांनी स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला. त्यात चार नागरिक ठार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोळीबारात ठार झालेले नागरिक आपल्या पक्षाचे समर्थक होते, असे तृणमूल काँग्रेसने सांगितले.

गोळीबाराच्या घटनेमुळे सितलकुची भागातील १२६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात येणार असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले. विशेष निरीक्षकांनी दिलेल्या अंतरिम अहवालानंतर निवडणूक आयोगाने जोरपटकी मतदान केंद्रावरील निवडणूक प्रक्रिया थांबविण्याचा निर्णय घेतला. जवळपास ३५० जणांच्या जमावाने सुरक्षा दलाच्या जवानांना घेरले होते. त्यामुळे स्वसंरक्षणार्थ त्यांना गोळीबार करावा लागला, असे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर केलेल्या प्राथमिक अहवालामध्ये म्हटले आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे या घटनेचा अहवाल मागण्यात आल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

भाजपचे कूचबिहारचे खासदार निसिथ प्रामाणिक दिनहाटा मतदारसंघातून निवडणूक लढवीत असून त्यांनी तृणमूल काँग्रेसनेच मतदान केंद्रावर हल्ला केल्याचा आरोप केला आहे. तृणमूलच्या गुंडांनी मतदान केंद्र ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय संरक्षण दलांवर हल्ला केला, त्यात स्वसंरक्षणार्थ जवानांनी गोळीबार केला, असे ते म्हणाले.

संरक्षण दलांविरुद्ध नागरिकांना ममता यांची फूस : मोदी

सिलिगुडी : तृणमूल काँग्रेस हिंसाचाराला खतपाणी घालत असल्याचा आणि ममता बॅनर्जी नागरिकांना केंद्रीय संरक्षण दलांविरुद्ध चिथावणी देत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या घटनेला जबाबदार असलेल्यांविरुद्ध कठोरकारवाईची विनंती त्यांनी निवडणूक आयोगाला केली.

अमित शहा यांनी राजीनामा द्यावा : ममता बॅनर्जी

बदुरिया/हिंगलगंज : सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाल्याची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी केली. गोळीबाराच्या निषेधार्थ रविवारी राज्यभर निदर्शने करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

चौथ्या टप्प्यात ७६.१६ टक्के मतदान

कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या चौथ्या टप्प्यात ४४ जागांसाठी शनिवारी मतदान झाले. याही टप्प्यात मतदारांनी उत्साहाने मतदान केले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत एक कोटी १५ लाख मतदारांपैकी ७६.१६ टक्के नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 11, 2021 12:01 am

Web Title: violence in west bengal akp 94
Next Stories
1 ब्रिटनमधील करोनासंसर्गात ६० टक्के घट
2 जावा बेटाला भूकंपाचा धक्का
3 करोना स्थिती हाताळण्यात केंद्राला अपयश
Just Now!
X