कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी मागच्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला आज हिंसक वळण लागले. दिल्लीच्या वेगवेगळया भागात पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक झाली. पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांडया फोडल्या तर आंदोलकांनी पोलिसांवर हल्ले केले.
या संपूर्ण वादात कोणी काय म्हटलं आहे ? ते आपण जाणून घेऊया

“हिंसा कुठल्याही समस्येचं उत्तर नाही. जखम कुणालाही होवो नुकसान आपल्या देशाचचं होणार आहे. देशहितासाठी कृषीविरोधातील कायदे मागे घेण्यात यावेत.” असे राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

उत्तर-पूर्व दिल्लीचे खासदार गौतम गंभीर म्हणाले की, “हिंसाचार आणि तोडफोडीने काहीही साध्य होणार नाही. कराराचा आदर करा आणि शांतता राखण्याचे मी आवाहन करतो. आजचा दिवस गोंधळ घालण्याचा नाही.”

“दिल्लीत आज जे पाहायला, मिळालं ते धक्कादायक आहे. काही घटकांनी केलेला हिंसाचार मान्य नाही. शेतकऱ्यांनी शांततामय मार्गाने आंदोलन करुन, जे काही कमावलं होतं, ते निष्प्रभावी ठरणार. शेतकरी नेत्यांनी तात्काळ ट्रॅक्टर मोर्चा थांबवला पाहिजे” असे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

“पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये जो हिंसाचार झाला, त्याला केंद्र सरकारची असंवेदनशीलत जबाबदार आहे. पहिलं म्हणजे  शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हे कायदे मंजूर करण्यात आले. त्यानंतर दिल्लीसह देशभरात शेतकरी आंदोलन करत असताना खूप सहजतेने हा विषय हाताळण्यात आला. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन, हे कायदे रद्द करावेत” असे ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

“आजच्या आंदोलनातील हिंसाचाराचा आम्ही कठोरपणे निषेध करतो. केंद्र सरकारने परिस्थिती इतपत खराब होऊ दिली, हे खेदजनक आहे. मागच्या दोन महिन्यापासून हे आंदोलन शांततेत सुरु होतं” असं आम आदमी पार्टीचे आमदार राघव चढ्ढा यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

हे खूप दुर्देवी आहे. मी शेतकरी आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा दिला आहे. पण मी हिंसाचाराकडे डोळेझाक करणार नाही, आणि प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर तिरंगाच फडकला पाहिजे असे काँग्रेस नेते शशी थरुर यांनी म्हटलं आहे.

लाल किल्ल्यावर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. तिरंग्याचा अनादर अजिबात मान्य नाही. लोकशाहीमध्ये कुठलाही हिंसाचार मान्य नाही. कायदा सर्वोच्च आहे असे शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे.