जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू)  पाच जानेवारी रोजी झालेला हिंसाचार हा सरकार पुरस्कृत होता, तसेच या हिंसाचार प्रकरणी कुलगुरू एम. जगदीश कुमार यांना निलंबित करून त्यांच्याविरोधात चौकशी सुरू करण्यात यावी, असे काँग्रेसच्या  सत्यशोधन समितीने म्हटले आहे.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार प्रकरणी काँग्रेसने चार सदस्यांची सत्यशोधन समिती नेमली होती. या समितीने ५ जानेवारीच्या प्रकाराची सखोल चौकशी केली आहे. समितीच्या सदस्या सुश्मिता देव यांनी सांगितले,की कुलगुरू जगदीश कुमार यांना निलंबित करण्यात यावे, विद्यापीठातील सर्व नेमणुकांची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. कुलगुरूंविरोधात फौजदारी चौकशी करण्यात यावी. साबरमती वसतिगृह , पेरियार वसतिगृह व इतर ठिकाणी धुडगूस घालणाऱ्या हल्लेखोरांना सामील असलेल्या सुरक्षा कंपनीचे कंत्राट रद्द करण्यात यावे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील हिंसाचार सरकार पुरस्कृत होता हे स्पष्ट झाले आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात जी  शुल्कवाढ करण्यात आली ती पूर्णपणे रद्द करण्यात यावी.

सत्यशोधन समितीत खासदार व  एनएसयूआयचे माजी अध्यक्ष हिबी इदेन, जेएनयू एनएसयूआयचे माजी अध्यक्ष व खासदार  सय्यद नासीर हुसेन, माजी एनएसयूआय अध्यक्ष व माजी डीयूएसयू अध्यक्ष अमृता धवन यांचा समावेश होता. पाच जानेवारी रोजी चेहरा झाकलेल्या हल्लेखोरांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या परिसरात घुसून हिंसाचार केला होता, त्यात अनेक विद्यार्थी व शिक्षक जखमी झाले. या प्रकरणी अखिल भारतीय विद्याथी परिषद व डाव्या संघटना यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले आहेत.