पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात काल रात्री भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन भारतीय जवानांसह एक अधिकारी असे तीन जण शहीद झाले.

– गलवान खोऱ्यात पेट्रोलिंग पॉईंट १४ जवळ भारत आणि चीनचे सैनिक परस्परांना भिडले. यामध्ये चीनच्या बाजूला देखील जिवीतहानी झाली आहे. आता तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून चर्चा सुरु आहे.

– पाच आणि सहा मे रोजी पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळ दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये हाणामारी झाली होती. अगदी तशीच हाणामारी काल रात्री सुद्धा झाली. यामध्ये रॉड आणि दगडांचा वापर करण्यात आला.

– भारतीय लष्कराने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री ही हाणामारी झाली.

– चीनच्या बाजूला देखील जिवीतहानी झाली आहे. पण नेमके किती नुकसान झालेय ते आताच सांगता येणार नाही असे लष्कराकडून सांगण्यात आले. टाइम्स ऑफ इंडियाने एजन्सीच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.

– दोन्ही बाजूकडून गोळीबार झाला नसल्याचे लष्कराकडून सांगण्यात आले.

– १९६२ सालच्या भारत-चीन युद्धानंतर सीमेवर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना घडल्या. १९७५ साली चीनला लागून असलेल्या सीमेवर गोळीबार झाला. त्यामध्ये भारताचे चार जवान शहीद झाले होते. त्यानंतर मात्र कधीही भारताच्या बाजूला एकही जवान शहीद झाला नव्हता. पण काल रात्री ४५ वर्षानंतर पहिल्यांदाच चीन बरोबर झालेल्या संघर्षात भारताने आपले तीन वीरपुत्र गमावले आहेत.

– संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि तिन्ही सैन्य दलांच्या प्रमुखांसोबत तातडीची बैठक घेतली. नेमकं काल रात्री काय घडलं? याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

– “सोमवारी भारतीय जवानांनी अवैधरित्या सीमारेषा ओलांडून चीनच्या सैनिकांवर हल्ला केला. तसंच दोन्ही देशांमध्ये झालेल्या सहमतीचंही उल्लंघन केलं. यामुळे काही गंभीरित्या झटापट झाली,” अशी माहिती चीनचे वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या हवाल्यानं दिली आहे.