जागतिक कीर्तीचे व्हायोलीनवादक पंडित डी. के. दातार यांचे बुधवारी रात्री अल्प आजाराने निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी आणि डॉ. निखिल व डॉ. शेखर ही मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. गायकी अंगाने व्हायोलीन वादन करणारे एक अतिशय वरच्या दर्जाचे कलावंत म्हणून ते प्रसिद्ध होते.

भारतीय अभिजात संगीतात सर्वात जुन्या अशा ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार त्यांच्यावर होते. त्यांचे वडील केशवराव हे विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे गुरुबंधू. त्यामुळे अगदी लहान वयातच त्यांच्यावर घराणेदार स्वरसंस्कार झाले. याच वयात मोठे बंधू नारायणराव यांनी त्यांच्या हातात व्हायोलीन हे वाद्य दिले आणि त्यानंतर त्यांनी या वाद्याची संगत कधीच सोडली नाही. वाद्य शिकण्यासाठी त्याकाळी मुंबईत प्रसिद्ध असलेल्या प्रो. बी. आर. देवधर यांच्या स्कूल ऑफ म्युझिकमध्ये ते दाखल झाले आणि ख्यातनाम व्हायोलीनवादक विघ्नेश्वर शास्त्री यांच्याकडून त्यांनी तालीम घ्यायला सुरुवात केली.

ग्वाल्हेर घराण्याचे संस्कार असल्याने हे पाश्चात्य वाद्य गायकी अंगाने वाजवण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि त्यावर प्रभुत्व मिळवले. ख्याल, ठुमरी, भजन यासारख्या गायनकलेतील प्रकारांमध्ये त्यांनी प्रावीण्य मिळवले आणि भारतातील अनेक दिग्गजांबरोबर अभिजात संगीताच्या मफलीत साथसंगत केली. भारत सरकारने त्यांना पद्मश्री या पुरस्काराने गौरवले. तर संगीत नाटक अकादमीचा आणि महाराष्ट्र शासनाचा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला. भारतातील सगळ्या संगीत महोत्सवांमध्ये पं. दातार यांच्या व्हायोलीन वादनाच्या मफली झाल्या आणि रसिकांनीही त्याला भरभरून दाद दिली.

परदेश दौऱ्यांमध्ये जगातील अनेक देशांमध्ये त्यांच्या वादनाचे चाहते आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या वादनाचे कार्यक्रम गेली अनेक दशके आवर्जून आयोजित करण्यात येत असत. भारतातील अनेक विद्यापीठांमध्ये पं. दातार अध्यापन करीत असत.