पाकिस्तानकडून अनेकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर किंवा इतर माध्यमांमधून काश्मीर मुद्द्यावरुन भारताला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र सर्वच ठिकाणी भारत पाकिस्तानला जशाच्या तसे उत्तर देत त्यांचा हेतू साध्य होऊ देत नाही हे अनेकदा दिसून आलं आहे. पाकिस्तानमधील विचारवंतांनी आयोजित केलेल्या अशाच एका वेबिनारमध्ये हॅकर्सने गोंधळ उडवून दिल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. काश्मीर विषयावर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या झूमवरील वेबिनारमध्ये अचानक जय श्रीरामच्या घोषणा ऐकू येऊ लागल्याने सर्व सहभागी झालेले लोकं गोंधळले. भारतीय हॅकर्सनेच हे कृत्य केल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे.

काश्मीरच्या मुद्द्यावर बोलण्यासाठी काही पाकिस्तानी अधिकारी एका आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी झाले होते. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झूमवर हे वेबिनार आयोजित करण्यात आलं होतं. मात्र वेबिनार सुरु असतानाच अचानक हिंदी गाणी वाजू लागली. वाजणारी गाणी ही भरतीय होती. या गाण्यांमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या जात होत्या. भारतामध्ये भगवान रामांच्या उत्सवामध्ये किंवा रामभक्तांकडून ही गाणी वाजवली जातात. या सेमिनारमध्ये सहभागी झालेल्या काही जणांना या सेमिनारचे होस्ट असणाऱ्या डॉ. वालीद मलिक यांच्याकडून ही गाणी वाजवली जात असल्यासारखे वाटले. ही गाणी बंद करावीत अशी मागणीही काही जणांनी वालीद यांच्याकडे केली. मात्र जय श्रीरामच्या घोषणा देण्यास सुरुवात झाल्यानंतर अनेकांना हा प्रकार हॅकिंगचा असल्याचे लक्षात आले.

या गाण्यांच्या दरम्यान, “आम्ही भारतीय आहोत”, “तुम्ही असेच रडत राहा” अशा घोषणाही देण्यात आल्या. डॉ. वालीद यांनी आपण हे सर्व रेकॉर्ड करत असल्याचे सांगितले. सध्या हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाला आहे. यापूर्वीही भारतीय हॅकर्सने पाकिस्तानमधील विद्यापिठांच्या वेबसाईट हॅक केल्याचा दावा करण्यात आला होता.

काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवल्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झालं आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून या प्रकरणावरुन पाकिस्तान भारतावर टीका करताना दिसत आहे. पाकिस्तानने आधी नवा नकाशा जारी करुन वादग्रस्त भूभाग आपल्या नकाशात दाखवला. त्यानंतर पाकिस्तानने गिलगिट-बाल्टिस्तानला प्रांताचा दर्जा देण्याची घोषणाही केली. नोव्हेंबर महिन्यात येथे निवडणूका घेण्याचा पाकिस्तानचा विचार असून भारताचा याला विरोध आहे.