गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून यामध्ये महिलांनी मासिक पाळीच्या ५ दिवस आधी किंवा ५ दिवस नंतर करोनाची लस न घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. असे केल्यास महिलांची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याचा देखील दावा या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे महिला वर्गामध्ये लसीकरणाविषयी संभ्रम निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे. नेमकी लस कधी घ्यावी? असा देखील प्रश्न काही महिलांकडून विचारला जाऊ लागला आहे. मात्र, ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर Press Information Bureau च्या ऑफिशियल ट्विटर हँडलवरून याविषयी खुलासा करण्यात आला आहे. तसेच, या पोस्टमधील दाव्याविषयी सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

काय आहे या पोस्टमध्ये?

सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या पोस्टमध्ये १ मे पासून सुरू होणाऱ्या लसीकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे. “१८ वर्षांवरील सर्वांसाठी १ मे पासून लसीकरणाला सुरुवात होत आहे. मुलींसाठी हे फार महत्त्वाचं आहे की त्यांनी मासिक पाळीनुसारच लस घेण्यासाठी जावं. मासिक पाळीच्या ५ दिवस आधी किंवा नंतर मुलींनी लस घ्यायला जाऊ नये. या काळात तुमची प्रतिकारशक्ती कमी असते. लसीचा डोस आधी तुमची प्रतिकारशक्ती कमी करतो. कालांतराने तुमची प्रतिकारशक्ती वाढू लागते. त्यामुळे मासिक पाळीच्या काळात लस घेतल्यास धोका उद्भवू शकतो”, असा दावा या पोस्टमध्ये कऱण्यात आला आहे. तसेच, तुमच्या मित्रमंडळींपर्यंत देखील हा मेसेज पोहोचवण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Covishield Vaccine : जगभरात सिरमच्या लसीची सर्वाधिक किंमत भारतात!

व्हायरल पोस्टमध्ये अफवाच!

दरम्यान, PIB नं जाहीर केलेल्या Fact Check नुसार व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेला दावा खोटा आहे. आपल्या ट्विटर हँडलवरून पीआयबीनं हा फॅक्टचेक पोस्ट केला आहे. “सोशल मीडियावरून एक फेक पोस्ट व्हायरल होत असून त्यामध्ये मासिक पाळीच्या ५ दिवस आधी आणि नंतर लस न घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पण अफवांना भुलू नका. १ मे नंतर १८ वर्षांवरील सर्वांनीच लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. आरोग्य सेतू मोबाईल अॅप आणि cowin.gov.in या संकेतस्थळावर २८ एप्रिलपासून लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू होईल”, असं पीआयबीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

१ मे पासून १८ वर्षांवरील सर्वांना लसीकरण!

केंद्र सरकारने नुकतीच यासंदर्भात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली. यानुसार लसीकरण सुरू करण्यात येणार असून महाराष्ट्रात देखील त्यासंदर्भातली तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. आवश्यक असलेला लसीचा साठा कसा उपलब्ध करून घ्यायचा, यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांनी १ मेपासून लसीचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार सरकारला लसीच्या प्रत्येक डोससाठी ४०० रुपये मोजावे लागणार असून खासगी रुग्णालयांना लसीच्या एका डोससाठी ६०० रुपये मोजावे लागणार आहेत.