पोलीस निरीक्षकाची बदली रद्द झाल्याचा सहकाऱ्यांना इतका आनंद झाला की, त्यांनी चक्क पोलीस ठाण्यातच ‘ओल्या पार्टीचं’ आयोजन करून धांगडधिंगा घातल्याचे समोर आले आहे. लोकांच्या रक्षणासाठी पोलीस असतात. मात्र मध्य प्रदेशातील विदिशा येथील पोलिसांनी वर्दीवर असतानाच मद्यपान करत डीजे लावून यथेच्छ नाचत ओली पार्टी केली. त्यांच्या या कृत्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार उघड झाला. आधीच सामान्यांमध्ये पोलिसांची बिघडत चाललेली प्रतिमा त्यात या व्हिडिओने आणखी भर घातली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेत या ठाण्याच्या प्रभारीसहीत चार पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. पोलीस ठाण्यात पार्टी करणे या महाभागांना चांगलेच महागात पडले आहे.

विदिशाच्या पोलीस अधीक्षकांनी दीपनखेडा पोलीस ठाण्याच्या परिसरात डीजे पार्टी व मद्यपान करून गोंधळ घातल्याप्रकरणी चार जणांना निलंबित केले. पोलीस अधीक्षक विनीत कुमार यांनी याची माहिती दिली. दि. १७ नोव्हेंबर रोजी रात्री जिल्हा मुख्यालयापासून ११० किमी अंतरावर दीपनखेडा पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलीस ठाण्याच्या प्रभारींच्या उपस्थितीत या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वारावरच हे पोलीस कर्मचारी नृत्य करत होते.

याप्रकरणी अंतर्गत चौकशीस सुरूवात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. सुरूवातीच्या तपासानंतर पोलीस निरीक्षक योगेंद्रसिंह परमान, हसन अलीम तसेच आणखी दोघांना निलंबित करण्यात आले आहे.