काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे चर्चेचा विषय बनले आहेत. हा किस्सा मुंबईतील नरसी मोनजी इन्स्टिट्यूटमधील (NMIMS) त्यांच्या भाषणाशी निगडीत आहे. या संस्थेतील विद्यार्थ्यांना संबोधित करतानाचे त्यांचे भाषण राजकीय ढंगाचे होते यात काही विशेष नसल्याचे विद्यार्थ्यांनी मतप्रदर्शन केले. परंतु, अचानकपणे त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ व्हायरल होऊ लागला आहे. त्यांच्या भाषणाचा जो हिस्सा व्हायरल होत आहे, त्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणतात, “एक दिवस तुम्हाला हा देश चालवायचा आहे. इन्स्टिट्युट चालवायची आहे… तुमच्यातील काही जण मायक्रोसॉफ्टचे स्टिव्ह जॉब्ज बनतील. तर काहीजण नेता बनतील आणि काहीजण फेसबुकसारख्या ऑनलाईल मंचाची निर्मिती करतील.” ‘मायक्रोसॉफ्टचे स्टिव्ह जॉब्ज’ असा चुकीचा उल्लेख केल्याने काँग्रेसचे युवराज विनोदाचा विषय बनले. दिवंगत स्टिव्ह जॉब्ज हे ‘अॅपल’ कंपनीचे संस्थापक आहेत तर मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स आहेत. राहुल गांधी यांनी याआधीदेखील अशाप्रकारची चूक केली आहे. तेव्हासुद्धा सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडविण्यात आली होती.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 18, 2016 6:11 pm