News Flash

विरार रुग्णालय आग : मृतांच्या नातेवाईकांना सात लाखांची मदत; पंतप्रधान मोदी, पालकमंत्र्यांची घोषणा

मोदींनी विरारमध्ये घडलेल्या या अपघाताबद्दल खेद व्यक्त केलाय

बुधवारी नाशिकमधील रुग्णालयामध्ये ऑक्सिजन गळती होऊन २२ जणांचा मृत्यू झाल्याचं प्रकरण ताजं असतानाच आज विरारमधील कोव्हिड रुग्णालयाला लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेल्या आगीत १३ रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्यरात्री आयसीयूमध्ये लागलेल्या आगीत या रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान आपत्कालीन मदतनिधीमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येक दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर केली आहे. त्यामुळेच मृतांच्या नातेवाईकांना केंद्राकडून दोन लाख तर राज्याकडून पाच लाख असा सात लाखांचा मदतनिधी मिळणार आहे.

नक्की वाचा >> विरार रुग्णालय आग : “महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यूतांडव सुरु आहे, टोपेंचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवा”

पंतप्रधान कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन यासंदर्भातील घोषणा करण्यात आलीय. “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमधून विरार येथील रुग्णालयाला लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत देण्यास मंजूरी दिलीय. या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्यांना ५० हजारांची मदत देण्याचाही निर्णय घेण्यात आलाय,” असं ट्विट पीएमओच्या अकाऊंटवरुन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान मोदींनी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त केला आहे. “विरारमधील रुग्णालयामध्ये आग लागण्याची घटना दु:खद आहे. आपल्या नातेवाईकांना गमवलेल्यांचं मी सांत्वन करतो. जखमींच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा होवो, अशी इच्छा व्यक्त करतो,” असं मोदींनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

“विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात अतिदक्षता विभागास आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आग विझवणे व इतर रुग्णांवरील उपचार सुरू राहतील याकडे लक्ष देण्यास सांगितले,” अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली आहे.

“उपचार घेत असलेल्या इतर रुग्णांना झळ पोहचू नये याकडे लक्ष देत त्यांची लगेचच इतरत्र व्यवस्था करावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. या खासगी रुग्णालयात अग्नी सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली होती किंवा नाही हे पाहून तातडीने योग्य ती चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत,” अशी माहिती देण्यात आली आहे.

गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. “विरार येथील विजय वल्लभ हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागामध्ये लागलेल्या आगीत १३ रुग्णांचा होरपळल्याने मृत्यू ओढवला. ही घटना अतिशय दुर्दैवी व वेदनादायी आहे. दुर्घटनेतील मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली! या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिस महासंचालकांना देण्यात आले आहेत,” अशी माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे.

राजेश टोपेंची प्रतिक्रिया

“विरारमधील घटना दुर्दैवी आणि ह्रदय पिळवटून टाकणारी आहे. ज्यांचा काही दोष नाही त्यांना जीव गमवावा लागला आहे. मी जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त, स्थानिक आमदार आणि इतरांशी चर्चा केल्यानंतर एसीचा स्फोट झाल्याचं सांगण्यात आलं. एसीचा स्फोट झाल्यानंतर दोन ते तीन मिनिटांत धूर झाला आणि आगीने घेरलं. दरवाजाच्या अगदी जवळ होते ते चार रुग्ण वाचू शकले. पण आयसीयूमध्ये असणारे इतर १३ रुग्ण वाचू शकले नाहीत,” असं राजेश टोपेंनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. “हे खासगी रुग्णालय असून माणिक मेहताच्या मालकीची इमारत आहे. दिलीप शाह आणि पाठक गेल्या पाच वर्षांपासून हे रुग्णालय चालवत आहेत. तीन मजल्यांची इमारत असून दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली. इतर कुठे ही आग पसरली नाही. गरज आहे त्यांना इतरत्र हलवण्यात आलं आहे,” अशी माहिती राजेश टोपेंनी दिली. “ही घटना दुर्दैवी असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणलं आहे. शासकीय स्तरावरुन योग्य मदत केली जाईल. राज्य सरकार त्यांच्या दुखात सहभागी आहे. हा स्फोट कसा झाला? तो टाळता येऊ शकला असता का? याची चौकशी होणं गरजेचं आहे,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत.

महाराष्ट्रात मृत्यूतांडव सुरुय, टोपेंचा राजीनामा घ्या…

“महाराष्ट्रात कोव्हिड मृत्यूतांडव सुरु आहे. ठाकरे सरकारने आता हा प्रतिष्ठेची मुद्दा न बनवता केंद्र सरकार, लष्कराची मदत घ्यावी. महाराष्ट्रातील सर्व कोव्हिड केंद्रामधील ऑक्सिजन आणि फायर ऑडिट तातडीने करण्यात यावं. यासाठी या श्रेत्रातील तज्ज्ञांची मदत घेण्यात यावी. तसेच महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा राजीनामा घेऊन त्यांना घरी पाठवलं पाहिजे,” असं मत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी व्यक्त केलं आहे.

फडणवीस म्हणतात…

देवेंद्र फडणवीस यांनीही ट्विटरवरुन विरारमधील घटनेसंदर्भात प्रतिक्रिया दिलीय. “आणखीन एक धक्कादायक घटना. विरारमधील कोव्हिड रुग्णालयामधील आयसीयूला लागलेल्या आगीत काही जणांचा मृत्यू झाल्याचं समल्याने खूप दु:ख झालं आहे. माझ्या सद्भभावना मृतांच्या कुटुंबियांसोबत आहेत. करोना रुग्णांच्या प्रकृतीमध्ये लवकरात लवकर सुधारणा होवो, अशी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आमची मागणी असून यासाठी कारणीभूत असणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,” असं फडणवीस म्हणाले आहेत.

एसीचा स्फोट झाल्याने आग

विरारमधील विजय वल्लभ रुग्णालयात लागलेलेली आग ही एसीचा स्फोट झाल्याने लागली असल्याची माहिती डॉक्टर दिलीप शाह यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. रुग्णालयात सेंट्रलाइज एसी असून दोनच मिनिटात आग सगळीकडे पसरली अशी माहिती त्यांनी दिली आहे. रात्री ३ वाजता लागलेल्या आगीनंतर रुग्णालयात धावपळ सुरु झाली होती. आयसीयूमध्ये एकूण १७ रुग्ण होते. यामधील चौघे जण जे चालू शकत होते त्यांनी स्वत:ची सुटका करुन घेतली. मात्र इतर रुग्ण आपला जीव वाचवू शकले नाहीत आणि आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला. आगाची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले होते. घटनास्थळी पोहचल्यानंतर काही वेळताच आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश मिळालं आहे.

इतर रुग्णांना दुसरीकडे हलवण्यात आलं

रुग्णालयात एकूण ९० रुग्ण दाखल होते. आग लागल्यानंतर ऑक्सिजनवर असणाऱ्या तसंच गंभीर प्रकृती असणाऱ्यांना इतर रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. २१ रुग्णांना इतरत्र हलवण्यात आलं असून यामध्ये चार महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं रुग्णालयाने सांगितलं आहे.

मृतांची नावं –
१) उमा सुरेश कनगुटकर –  (स्त्री – ६३ वर्ष)

२) निलेश भोईर –  (पुरुष – ३५ वर्ष)

३) पुखराज वल्लभदास वैष्णव – (पुरुष – ६८ वर्ष)

४) रजनी आर कडू  – (स्त्री – ६० वर्ष)

५) नरेंद्र शंकर शिंदे  – (पुरुष – ५८ वर्ष)

६) जनार्दन मोरेश्वर म्हात्रे – (पुरुष – ६३ वर्ष)

७) कुमार किशोर दोशी – (पुरुष – ४५ वर्ष)

८) रमेश टी उपयान  – (पुरुष – ५५ वर्ष)

९) प्रविण शिवलाल गोडा (पुरुष – ६५ वर्ष)

१०) अमेय राजेश राऊत – (पुरुष – २३ वर्ष)

११) शमा अरुण म्हात्रे  – (स्त्री – ४८वर्ष)

१२) सुवर्णा एस पितळे – (स्त्री – ६४ वर्ष)

१३) सुप्रिया देशमुख – (स्त्री – ४३ वर्ष)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 9:30 am

Web Title: virar hospital fire narendra modi approved rs 2 lakh each from pmnrf for the next of kin people died scsg 91
Next Stories
1 रुग्णविस्फोट!
2 राष्ट्रीय योजना सादर करा!
3 १८ वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांची लसीकरणासाठी नोंदणी २८ एप्रिलपासून
Just Now!
X