दक्षिण आफ्रिकेवर घरच्या मैदानावर विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ बांगलादेशच्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. ३ नोव्हेंबरपासून बांगलादेशच्या भारत दौऱ्याला सुरुवात होणार असून यामध्ये दोन्ही संघ ३ टी-२० आणि २ कसोटी सामने खेळतील. दिल्लीत ३ तारखेला पहिला टी-२० सामना खेळवला जाईल. मात्र मंगळवारी राष्ट्रीय तपास यंत्रणेला कर्णधार विराट कोहलीच्या जीवाला ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा अतिरेकी संघटनेकडून धोका असल्याचं समोर आलं. याचसोबत दिल्लीत पहिल्या सामन्यादरम्यानही भारतीय संघावर हल्ला होण्याची शक्यता असल्यामुळे, भारतीय संघाच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात येणार आहे.

बांगलादेशविरुद्ध टी-२० मालिकेसाठी विराट कोहलीची भारतीय संघात निवड झालेली नाही. विराटच्या ऐवजी रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करणार आहे. मात्र अतिरेकी संघटनेच्या हिटलिस्टमध्ये भारतीय संघाच्या कर्णधाराचं नाव आल्यामुळे राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्ली पोलिसांना संघाच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

केरळ मधील कोझिकोड येथील, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबाच्या High Power Committee ने देशभरातील महत्वाच्या व्यक्तींवर हल्ला करण्याचा कट रचला आहे. ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. याच यादीत सर्वात शेवटी विराट कोहलीचंही नाव आल्याने एकच खळबळ माजली आहे. दरम्यान या यादीत विराट कोहलीचं नाव कोणत्या कारणामुळे आलं याबद्दलची कोणतीही ठोस माहिती सुरक्षा यंत्रणांकडून समोर आलेली नाहीये.

अवश्य वाचा – भारतीय कर्णधार विराट कोहली अतिरेक्यांच्या निशाण्यावर

दरम्यान जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑल इंडिया लष्कर-ए-तोयबा हे नाव भारतात नवीन असलं तरीही याची सुत्र ही पाकिस्तानमधूनच हलवली जात असल्याची शक्यता आहे. काश्मीरमध्ये ३७० कलम हटवल्यानंतर पाकिस्तानचा तिळपापड झाला होता. मात्र दहशतवादामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनाम झाल्यामुळे, विराट कोहली आणि अन्य महत्वाच्या व्यक्तींना भारतामधील अतिरेकी संघटना धमकी देत असल्याचं चित्र उभं करण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे. भविष्यकाळात भारतामध्ये कोणत्याही प्रकारचा हल्ला झाल्यास संशयाची सूई आपल्याकडे न येण्यासाठी पाकिस्तानचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचं जाणकारांचं मत आहे. दरम्यान या हिटलिस्टनंतर विराट कोहलीच्या सुरक्षेत वाढ केली जाण्याची शक्यता आहे.