‘फोर्ब्स’कडून नुकतीच जगात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या आघाडीच्या १०० खेळाडूंची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने स्थान पटकावले आहे. या यादीत स्थान मिळणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. तर टेनिसपटू सेरेना विल्यम्स ही यादीत स्थान मिळालेली एकमेव महिला खेळाडू आहे. फोर्ब्सच्या या यादीत प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो जगातील सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू ठरला आहे.
दरम्यान, विराट कोहलीचा या यादीतील समावेश ही भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बाब ठरली आहे. २.२ कोटी डॉलर्स इतकी कमाई करणाऱ्या विराट कोहली या यादीत ८९व्या स्थानावर आहे. विराटच्या २.२ कोटी डॉलर्स या एकूण उत्पन्नात बीसीसीआयकडून मानधनापोटी मिळणारे ३० लाख आणि जाहिरातींसाठी मिळणाऱ्या १.९ कोटींचा समावेश आहे.

विराटचा नवा विक्रम; शाहरुख, धोनीला टाकलं मागे
काही दिवसांपूर्वीच विराटने शाहरूख खान आणि महेंद्रसिंग धोनी यांना मागे टाकत पेप्सिको कंपनीसोबत मोठ्या रक्कमेचा करार केला होता. गेल्या वर्षापर्यंत कोहली एका दिवसाच्या जाहिरात चित्रीकरणासाठी अडीच ते साडेतीन कोटी मानधन घेत होता. मात्र, आता कोहलीच्या एका दिवसाच्या शूटसाठी कंपनीला तब्बल पाच कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. तत्पूर्वी फेब्रुवारी महिन्यात विराटने जर्मनीच्या ‘प्यूमा’ या स्पोर्ट्सवेअर कंपनीशी ८ वर्षांसाठी तब्बल ११० कोटींचा करार केला होता. प्यूमासोबतच कोहलीने ऑडी कार, एमआरएफ टायर्स, टिस्कॉट वॉचेस, जिओनी मोबाईल, बूस्ट, कोलगेट टूथपेस्ट आणि विक्स या अग्रगण्य ब्रॅण्ड्ससोबत करार केले आहेत.
फोर्ब्सच्या यादीतील हे खेळाडू २१ देशांतून आणि ११ विविध खेळ खेळणारे आहेत. टेनिसपटू सेरेना विल्यम्सच्या रूपाने केवळ एका महिलेलाच यादीत स्थान मिळाले आहे. तब्बल २.७ कोटी रूपये कमावणारी सेरेना यादीमध्ये ५९व्या क्रमांकावर आहे. तर यादीत हमखास स्थान मिळवणाऱ्या मारिया शारापोव्हा हिला यंदा टॉप १०० खेळाडूंमधून बाहेर राहावे लागले आहे. उत्तेजक चाचणीत दोषी ठरल्यामुळे टाकण्यात आलेल्या बंदीमुळे मारियाला जाहिरातमधून मिळणारे उत्त्पन्न कमी झाले आहे.

भारतीय क्रिकेटपटूंची गडगंज गरिबी