माजी केंद्रीय मंत्री अरूण जेटली यांचं आज दुपारी १२ वाजून ०७ मिनिटांनी निधन झालं. ते ६६ वर्षांचे होते. जेटली यांना श्वसनाचा त्रास होत असल्याने त्यांना गेल्या काही दिवसांपासून दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली. जेटली यांच्या निधनामुळे देशाचे मोठे नुकसान झाल्याची भावना अनेक बड्या नेत्यांनी तसेच क्रिकेटपटूंनी व्यक्त केली आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर असणारा भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यानेही ट्विट करुन जेटली यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. तसेच ‘माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी घरी आले होते,’ अशी आठवणही कोहलीने ट्विटमध्ये सांगितली आहे.

जेटलींना क्रिकेटची विशेष आवड होती. त्यांनी १९९९ पासून ते २०१३ पर्यंत दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेचे (डीडीसीए) अध्यक्ष पद भूषवले. या पदावर असताना दिल्लीमधील क्रिकेटच्या सुधारणेसाठी आणि नवीन स्टेडियम बांधण्यासाठी विशेष प्रयत्न केले. जेटलींनी दिल्लीमधील क्रिकेटचा दर्जा सुधारण्यासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांनी राबवलेल्या अनेक योजना आणि प्रयत्नांमुळेच दिल्लीतील अनेक क्रिकेटपटूंना भारतीय संघापर्यंत मजल मारता आली.

जेटलींच्या निधनानंतर विराट कोहलीनेही ट्विट करुन आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “जेटली यांच्या निधनाच्या बातमीने धक्का बसला असून खूप दु:ख झाले. जे खरचं खूप चांगले होते. ते नेहमी इतरांना मदत करत. २००६ साली जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा ते वेळात वेळ काढून माझ्या घरी त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी आहे होते. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” असं ट्विट विराटने केले आहे.

जेटली यांच्या निधनानंतर दिल्लीतील अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी सोशल नेटवर्किंगवरुन शोक व्यक्त केला आहे. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि आकाश चोप्रा यांनीही ट्विटवरुन जेटलींच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.