भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिलेलं चॅलेंज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वीकारलं आहे. ‘विराट तुझं आव्हान मी स्वीकारलं, लवकरच याबाबतचा व्हिडीओ मी शेअर करेन’, असं ट्विट करुन पंतप्रधान मोदींनी आव्हान स्वीकारल्याची माहिती दिली.

यापूर्वी केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी ट्विटरवर एक फिटनेस चॅलेंज सुरू केलं होतं. फिटनेसबाबत जागरुकता वाढावी यासाठी व्यायाम करत असतानाचा स्वतःचा एक व्हिडीओ राठोड यांनी सोशल मीडियावर अपलोड केला होता. हा व्हिडीओ अपलोड करताना त्यांनी क्रीडा आणि चित्रपट क्षेत्रातील काही प्रमुख व्यक्तींना टॅग करुन त्यांनाही या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यामध्ये विराट कोहलीचाही समावेश होता. त्यानंतर कोहलीने हे चॅलेंज स्वीकारुन पूर्ण केलं आणि , ‘मी राज्यवर्धन राठोड सरांचं फिटनेस चॅलेंज स्वीकारलं आहे, आणि आता मी माझी पत्नी अनुष्का शर्मा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महेंद्रसिंग धोनी यांना चॅलेंज करतोय’, असं ट्विट केलं. यासोबतच त्याने स्वतःचा व्यायाम करतानाचा व्हिडीओही शेअर केला होता.