भारतात दरवर्षी रस्ते अपघातात मोठया प्रमाणावर मृत्यू होतात. या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरीकांना आपल्या प्राणाला मुकावे लागते. प्रत्येक अपघाताला वेगवेगळे कारण असते. पण दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघाताला ती व्यक्ति स्वत: जबाबदार असते. दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होणारे हे अपघात कमी करण्यासाठी आता कर्णधार विराट कोहलीने पुढाकार घेतला आहे.

विराटने त्याच्या टि्वटर अकाऊंटवर यासंबंधी एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये तो दारु पिऊन गाडी न चालवण्याचे इतरांना आवाहन करत आहे. भारतात दरदिवशी दारु पिऊन गाडी चालवल्यामुळे होणाऱ्या अपघातांमध्ये १९ जणांचा मृत्यू होता. दरवर्षी मद्याच्या अंमलाखाली गाडी चालवल्यामुळे अपघातांमध्ये ६७०० पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होतो. मी मद्याच्या अंमलाखाली गाडी न चालवण्याची प्रतिज्ञा करतो. तुम्ही सुद्धा माझ्यासोबत अशीच प्रतिज्ञा करा असे आवाहन विराटने केले आहे.

विराटला दंड
दरम्यान चेन्नई सुपर किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागल्यानंतर कर्णधार विराट कोहलीला आणखी एक धक्का बसला आहे. चेन्नई विरुद्धच्या सामन्यात षटकांची गती धीमी राखल्याबद्दल विराट कोहलीला तब्बल १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या आदर्श अचारसंहितेनुसार षटकांची गती राखण्याबाबतचे जे नियम आहेत त्यामध्ये यंदाच्या मोसमात आरसीबीने पहिल्यांदा नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यासाठी कोहलीला १२ लाख रुपये दंड ठोठावण्यात येत आहे. असे आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.