भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग क्रिकेटनंतर आता राजकीय मैदानावर आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करण्याची शक्यता आहे. भाजपाच्या तिकीटावर विरेंद्र सेहवाग लोकसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा आहे. भाजपा हरियाणातील रोहतक मतदारसंघातून सेहवागला उमेदवारी देऊ शकते.

२०१९ लोकसभा निवडणुकीसाठी रविवारी पार पडलेल्या भाजपाच्या कोअर कमिटी बैठकीत सहभागी एका वरिष्ठ नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, रोहतक मतदारसंघात काँग्रेसचे दिग्गज नेते दिपेंद्र सिंह हुड्डा यांचा पराभव करण्यासाठी विरेंद्र सेहवागच्या नावाची चर्चा झाली. प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी मात्र सेहवागला उमेदवारी देण्याचं वृत्त फेटाळून लावत अद्याप त्यांनी पक्षात प्रवेशही केला नसल्याचं सांगितलं.

दुसरीकडे भाजपाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ नेत्याकडे विरेंद्र सेहवागला ही ऑफर देण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नावाचा उल्लेख न करण्याच्या अटीवर एका वरिष्ठ नेत्याने टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, ‘सेहवागसंबंधी पक्षाने निर्णय घेतला आहे. आता यासाठी होकार द्यायचा की नाही हे संपूर्ण सेहवागवर अवलंबून आहे. ज्या नेत्याकडे विरेंद्र सेहवागशी चर्चा करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे तो नेता दिल्ली आणि एनसीआरमधील राजकारणात सक्रिय आहे’.