News Flash

जनुकीय क्रमनिर्धारण पथकाच्या प्रमुखांचा राजीनामा

सहकाऱ्यांकडून आश्चर्य; काँग्रेसची केंद्रावर टीका

डॉ. शाहीद जमील

सहकाऱ्यांकडून आश्चर्य; काँग्रेसची केंद्रावर टीका

नवी दिल्ली : जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्साकॉग’ या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी राजीनामा दिला आहे. यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले असून, काँग्रेसने केंद्र सरकारवर टीका केली आहे.

देशातील विषाणूंच्या प्रकारांची जनुकीय क्रमवारी निर्धारित करण्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांचा मिळून ‘इन्साकॉग’ हा गट केंद्र सरकारने स्थापन केला होता. गेल्या शुक्रवारी झालेल्या ‘इन्साकॉग’च्या बैठकीत डॉ. जमील यांनी राजीनाम्याची घोषणा केली. त्यासाठी डॉ. जमील यांनी कोणतेही कारण दिलेले नाही.

करोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत डॉ. जमील यांनी ‘द न्यू यॉर्क टाइम्स’मध्ये नुकताच एक लेख लिहिला होता. ‘‘करोना रोखण्यासाठीच्या सर्व शक्य उपाययोजनांना भारतीय वैज्ञानिकांचा पाठिंबा आहे. मात्र पुरावाआधारित धोरणनिर्मितीस त्यांना विरोधाचा सामना करावा लागतो’’, असे त्यांनी या लेखात नमूद केले होते. करोनाबाबत पुढील अभ्यास, संशोधन, भाकीते करता येणे शक्य होईल, अशी माहिती, तपशील उपलब्ध करून देण्याचे आवाहन सुमारे ८०० भारतीय वैज्ञानिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ३० एप्रिल रोजी केले होते, याकडेही त्यांनी या लेखात लक्ष वेधले होते. एकूणच सरकारच्या करोना हाताळणीबाबत त्यांनी नाराजी व्यक्त  केली होती.

डॉ. जमील यांच्या राजीनाम्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले. सरकारवरील नाराजीमुळे त्यांनी राजीनामा दिला असावा, अशी प्रतिक्रिया शुक्रवारच्या बैठकीत सहभागी झालेल्या त्यांच्या एका सहकाऱ्याने व्यक्त केली. अन्य तीन सहकाऱ्यांनीही डॉ. जमील यांचा राजीनामा हा अनपेक्षित असल्याचे म्हटले आहे.

सरकारच्या अज्ञानामुळे देशाचे नुकसान

सरकारच्या अज्ञानामुळे देशाचे नुकसान होत आहे. आता आणखी किती नुकसान होणार आहे, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

डॉ. जमील यांनी स्वत:हून राजीनामा दिला की त्यांना पायउतार होण्यास भाग पाडण्यात आले, असा सवाल काँग्रेस नेते मनीष तिवारी यांनी केला.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 2:48 am

Web Title: virologist dr shahid jameel quits as chairman of govt covid panel zws 70
Next Stories
1 लसीकरण मोहिमेचा दुसऱ्या लाटेत फायदा- पंतप्रधान मोदी
2 अपोलो रुग्णालयांच्या मदतीने स्पुटनिक लसीकरण
3 ‘हमास दहशतवाद्यांचे अड्डे नष्ट’
Just Now!
X