फेसबुकवर गेल्या काही दिवसांपासून एक व्हायरस फिरतो आहे. फेसबुकच्या मेसेज बॉक्समधून फिरणाऱया या व्हायरसने नेटीझन्स हैराण झाले आहेत. मेसेज बॉक्समधून आलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपल्या फेसबुक वॉलवर आपोआप अश्लिल व्हिडिओ शेअर होत असल्याच्या तक्रारी फेसबुक युजर्स करत आहेत. गेल्या काही दिवसांत फेसबुकवर हा व्हायरस वेगाने पसरत असून, काहींचे फेसबुक अकाऊंट्स या व्हायरसमुळे हॅक झाल्याच्याची तक्रारी पुढे आल्या आहेत.

फेसबुकवरील एखाद्या मित्राच्या नावाने मेसेज बॉक्समध्ये एका व्हिडिओची लिंक येते. त्यावर क्लिक केल्यास तुमच्या मित्रांना हाच व्हिडिओ आपोआप पाठवला जातो, तर फेसबुक वॉलवरही अश्लिल व्हिडिओ आपोआप पोस्ट होतो. या व्हायरसमुळे नेटीझन्सचे हाल झाले असून, अनेकांना जाहीररित्या आपल्या फेसबुक वॉलवर व्हायरस आल्याचे स्पष्टीकरण द्यावे लागत आहे.

या व्हायरसपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करावे..
० तुमच्या एखाद्या मित्राच्या नावाने तुमच्या फेसबुक मेसेजबॉक्समध्ये व्हिडिओची लिंक आल्यास क्लिक करण्याआधी त्याच्या यूआरएलची खात्री करून घ्यावी. संबंधित व्हिडिओचा यूआरएल फेसबुकशी संबंधित नसल्याचे त्याच्या यूआरएलवरून स्पष्ट दिसून येते.
० तुमच्या मेसेजबॉक्समधून संशयास्पद लिंक आल्यास त्वरित आपल्या फेसबुक अकाऊंटचा पासवर्ड बदलणे योग्य ठरेल.