भारतीय राजनैतिक अधिकारी देवयानी खोब्रागडे यांनी मोलकरणीस व्हिसा अर्जात म्हटल्याप्रमाणे वेतन न दिल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस एक महिन्याची मुदतवाढ मागितली असून त्यांच्या विनंतीला फिर्यादी पक्षाने कडाडून विरोध केला आहे. हे प्रकरण लवकर संपावे अशी आमची इच्छा आहे असे अमेरिकेने म्हटले आहे. खोब्रागडे यांनी अशी विनंती केली की, १३ जानेवारीला जे आरोपपत्र दाखल केले जाणार आहे त्याला महिनाभराची मुदतवाढ द्यावी कारण त्यामुळे मुदतीच्या दबावाखाली असलेल्या संबंधितांना या प्रकरणी सल्लामसलत करता येईल.
देवयानी खोब्रागडे यांच्यावर या प्रकरणात कारवाई करण्यात प्रमुख सूत्रधार असलेले जन्माने भारतीय असलेले अमेरिकी अधिवक्ता प्रीत भरारा यांच्या कार्यालयाने सांगितले की, देवयानी यांच्यावर अटकेनंतर तीस दिवसात आरोपपत्र दाखल करणे गरजेचे आहे. तथापि देवयानी यांनी सोमवारी उशिरा अमेरिकेतील दक्षिण न्यूयॉर्क जिल्ह्य़ाचे न्याय दंडाधिकारी सारा नेटबर्न यांच्याकडे आरोपपत्र दाखल करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. खोब्रागडे यांचे वकील डॅनिएल अरश्ॉक यांनी सांगितले की, प्राथमिक सुनावणी व आरोपपत्राची तारीख १३ जानेवारी ठेवली आहे, ती तीस दिवसांनी पुढे ढकलून १२ फेब्रुवारी २०१४ ठेवावी.
अरश्ॉक यांच्या विनंतीला उत्तर देताना भरारा यांनी न्यायाधीशांना लिहिले आहे की, खोब्रागडे यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यास मुदतावाढ देऊ नये व आरोपपत्र दाखल केले तरी संवादाची प्रक्रिया सुरू राहू शकते. गेल्या आठवडय़ात आम्ही अनेकदा याबाबत चर्चा केली आहे. ५ जानेवारीला सरकारने काही व्यवहार्य पर्याय सुचवले होते त्याला बचाव पक्षाने प्रतिसाद दिलेला नाही.
आता केवळ तीनच पर्याय
१. अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने देवयानी यांच्या संयुक्त राष्ट्रातील बदलीला मंजुरी देऊन कारवाईपासून संरक्षण देणे. भारत-अमेरिका यांच्यातील संबंध चांगले राहावेत असा मानणारा एक गट आहे त्यांना हा पर्याय योग्य वाटतो.
२. देवयानी यांच्यावर १३ जानेवारीला आरोपपत्र दाखल केल्यानंतर त्यांची संयुक्त राष्ट्रातील बदली मान्य करणे. यात अमेरिका व भारत या दोन्ही देशातील संबंध आणखी ताणले जाऊ शकतात.
३. देवयानी यांच्यावरील आरोपांमुळे त्यांची संयुक्त राष्ट्रातील बदली अमान्य करून भारताला धडा शिकवणे. देवयानी यांना या प्रकरणात सोडले तर इतर देशही त्याचा दाखला देत अशाच मागण्या करतील त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करणे.