विशाखापट्टणम येथील सिंदिया या भागात आठ वर्षांच्या मुलाचा कारमध्ये गुदमरुन मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बंगारु प्रेमकुमार (वय ८) असे मृत मुलाचे नाव आहे. नौदलाच्या हद्दीत ही घटना घडल्याने विशाखापट्टणम पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची परवानगी मागितली आहे.

प्रेमकुमारचे वडील बंगारु विनोद कुमार हे नौदलातील लेफ्टनंट कमांडर यांच्याकडे घरकाम करतात. सोमवारी सकाळी प्रेमकुमार हा वडिलांसोबत लेफ्टनंट कमांडर यांच्या घरी गेला होता. लेफ्टनंट कमांडर यांनी विनोद कुमार यांना कार साफ करायला सांगितली होती. सकाळी साडे नऊच्या सुमारास विनोद कुमार यांनी कार धुतली. यादरम्यान त्यांचा मुलगा प्रेमकुमार खेळता खेळता कारमध्ये गेला. मुलगा कारमध्ये बसल्याचे विनोद कुमार यांच्या लक्षात आले नाही. कार धुतल्यानंतर त्यांनी कार लॉक केली आणि ते निघून गेले.

बराच वेळ झाला तरी मुलगा दिसत नसल्याने विनोद कुमार यांनी शोधाशोध केली. मात्र, प्रेमकुमार सापडत नव्हता. दुपारी तीनच्या सुमारास विनोद कुमार यांना लेफ्टनंट कमांडर यांच्या कारमधील मागच्या सीटवर प्रेमकुमार बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी तातडीने मुलाला रुग्णालयात नेले. मात्र, तोवर मुलाचा मृत्यू झाला होता. कारमध्ये अडकल्यानंतर मुलाने मदत मागण्याचा प्रयत्न केला असेल, मात्र दरवाजे लॉक असल्याने त्याला बाहेर पडता आले नसावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

विशाखापट्टणमचे पोलीस निरीक्षक भास्कर यांनी या घटनेबाबत माहिती दिली. ‘संबंधित परिसर हा नौदलाच्या हद्दीत येतो. या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी आम्ही नौदलाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आहे. परवानगी मिळाल्यावर चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.