विषबाधेमुळे मृत्यू झाल्याची शक्यता असलेल्या प्रकरणांमध्ये व्हिसेराचे नमुने न्यायवैद्यक विभागाकडे पाठवावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिले. व्हिसेराच्या नमुन्यामुळे पोलिसांना या प्रकरणाचा तपास करण्यास सोपे जाऊ शकते, असे न्यायालयाने म्हटले आहे.व्हिसेरा हा माणसाच्या शरीरातील अवयव असतो. त्यामुळे एखाद्याचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्यास व्हिसेराचे नमुने घेतल्यानंतर त्याबाबत माहिती मिळू शकते. त्यामुळे न्यायवैद्यक विभागाकडे व्हिसेराचे नमुने सोपवल्यास विषबाधेमुळे मृत्यू झाला की नाही, याची माहिती मिळू शकते आणि मग पोलीस तपासात अडचणी येणार नाहीत, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
समन्सचा अधिकार
व्हिसेराच्या नमुन्यावरून न्यायालय या प्रकरणाशी संबंधित असलेल्याला समन्स पाठवू शकते.विषबाधेचा संशय असलेल्या व्यक्तीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर तात्काळ त्याच्या व्हिसेराचे नमुने न्यायवैद्यक विभागाकडे पाठवावे. त्यानंतर न्यायवैद्यक विभाग आपला अहवाल बनवून पोलिसांकडे किंवा न्यायालयांकडे पाठवू शकते, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे एकूण तपासकाम सुलभ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.