करोना व लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात मजुरांचं स्थलांतर झालं. स्थलांतरित झालेल्या मजुरांच्या हाताला रोजगार देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (२० जून) या अभियानाचा आरंभ बिहारपासून केला. या अभियानावरून गायक व संगीत दिग्दर्शक विशाल ददलानी यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

गरीब कल्याण रोजगार अभियानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील खगरिया येथून प्रारंभ केला. यावेळी त्यांनी स्थलांतरित मजुरांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी यांनी अभियानाचा शुभारंभ केल्यानंतर संगीत दिग्दर्शक व गायल विशाल ददलानीनं एक ट्विट करून पंतप्रधान मोदींना टोला लगावला आहे. “खूपच भारी. लॉकडाउनच्या वेळी स्थलांतरित मजुरांविषयी ना विचार केला, ना कोणतीही व्यवस्था केली. त्यामुळे हे मजूर शहरातून गावाकडे परतले आहे, हे आपण कदाचित विसरला असाल. हजारो लोक अनवाणी पायाने, रिकाम्या पोटी, लाचार होऊन आपापल्या गावाकडे पायी निघाले. कित्येक अर्ध्या प्रवासातच मरण पावले. त्यांच्यावरील संकटाला स्वतःसाठी संधी बनवू नका,” असा टोला विशालनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे.

आणखी वाचा- गरीबांना रोजगार देणारी ५० हजार कोटींची नवी योजना आहे तरी काय?

आणखी वाचा- आतापर्यंत शहरांना झळाळी दिली, आता गावांसाठी काम करा; पंतप्रधान मोदी यांचं स्थलांतरित मजुरांना आवाहन

गरीब कल्याण रोजगार अभियानाची सुरूवात करताना काय म्हणाले मोदी?

लॉकडाउन लागू केल्यानंतर विविध राज्यात काम करणारे लाखो मजूर आपापल्या घरी परतले. घरी परतल्यानंतर या मजुरांना काम उपलब्ध करुन देण्यासाठी केंद्र सरकारनं गरीब कल्याण रोजगार अभियान सुरू केलं आहे. या अभियानासाठी ५० हजार कोटी रूपयांची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. लॉकडाउनच्या काळात आपापल्या घरी परतलेले मजूर आपल्या गावाच्या विकासासाठी काहीतरी करू इच्छित आहे. देशाला मजुरांच्या भावना व अपेक्षा समजतात. गरीब कल्याण रोजगार अभियान हे त्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे. आमचा प्रयत्न आहे की, या अभियानाच्या माध्यमातून मजुरांना घरच्या जवळच काम मिळावं. आतापर्यंत तुम्ही तुमच्या कौशल्याने व श्रमाने शहरांना झळाळी देत होते. पण, ते आता गावांसाठी करावे,” असं आवाहन मोदी यांनी केलं.