देशातील वाढत्या लोकसंख्येवरुन विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वेळीच लोकसंख्या नियंत्रित करण्याची गरज असून ‘लोकसंख्या बॉम्ब’पासून देशाला वाचवलं पाहिजे असं मत प्रवीण तोगडिया यांनी व्यक्त केलं आहे. दोन पेक्षा जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांचा मतदानाचा हक्क काढून घेतला पाहिजे असं प्रवीण तोगडिया यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांना सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकाकचं कौतूक केलं.

प्रवीण तोगडिया नोएडा येथे कार्यकर्त्यांना संबोधित करत होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, “दोन पेक्षा जास्त मुलं जन्माला घालणाऱ्यांना निवडणूक लढण्यापासून तसंच मतदानाचा करण्यापासून वंचित ठेवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. तसंच त्या कुटुंबाला मिळणाऱ्या सरकारी सुविधाही बंद केल्या जाव्यात. देशाला लोकसंख्या बॉम्बपासून वाचवणं गरजेचं आहे”.

सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन त्यांनी मोदी सरकारचं कौतूक केलं. त्यांनी म्हटलं की, “केंद्र सरकारचा हा निर्णय कौतुकास्पद आहे. या कायद्यामुळे अत्याचार सहन केलेल्या लोकांना मदत मिळेल. पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशमधील हिंदू तसंच अन्य धर्मातील लोकांना चांगलं जीवन दिलं जाऊ शकतं”.

यावेळी त्यांनी सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला होणाऱ्या विरोधावरुन नाराजी व्यक्त केली. जे भारतीय आहे त्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याला घाबरण्याची गरज नाही. तसंच राष्ट्रीय नागरिक नोंदणीबाबतही चिंता करण्याची गरज नाही. राष्ट्रीय नागरिक नोंदणीमुळे घुसखोरांची माहिती मिळेल. यामुळे कोणत्याही भारतीय नागरिकाला घाबरण्याची गरज नाही.