एअर विस्ताराच्या मुंबई ते दिल्ली जाणाऱ्या विमानात एक अजब प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईहून दिल्लीला जाणारे एअर विस्ताराचे विमान अचानक लखनौकडे वळवण्यात आले. कमी इंधन असल्यामुळे हे विमान लखनौ विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात 153 प्रवासी प्रवास करत होते.

दरम्यान, विमानाने चार तासांचा प्रवास केल्यानंतर विमानात केवळ 5 मिनिटे पुरेल इतकेच इंधन शिल्लक होते. दिल्लीला जाणाऱ्या विमानाला लखनौला वळवण्यात आले. त्यानंतर ते विमान प्रयागराजकडे वळवण्यात आले. परंतु ते प्रयागराजला पोहोचण्यापूर्वीच ते पुन्हा लखनौ विमातळाकडे वळवले. लो व्हिजिबिलिटीमुळे विमान उतरवण्यात अडचणींचा सामना करावा लागत असल्याने वैमानिकांनी इमरजन्सी मेसेज पाठवून विमान लखनौ विमानतळावर उतरवले. त्यावेळी विमानाचा फ्यूएल टँक जवळपास रिकामा होत आला होता. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. जेव्हा विमान लखनौ विमानतळातळावर उतरवण्यात आले तेव्हा फ्यूएल टँकमध्ये 200 किलोग्रॅम म्हणजेच 5 मिनिट विमानाचे उड्डाण होईल इतकेच इंधन शिल्लक असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

विस्ताराचे हे विमान दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी 8 हजार 500 किलो इंधनासह रवाना झाले होते. मुंबई ते दिल्लीदरम्यान विमानाची वेळ दोन तासांपेक्षा कमी आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास करणाऱ्या डीजीसीएने दोन्ही वैमानिकांवर तात्पुरती बंदी घातली आहे. दरम्यान, कमी इंधन असतानाही विमान लँड होणं हे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही. वैमानिकांनी विमान लखनौकडे वळवल्यानंतर त्यांनी ऑटोमेटेड लँडिंगचा ऑप्शन का स्वीकारला नाही, असा सवाल एका वरिष्ठ वैमानिकाने केला.

वैमानिकांनी विमान लखनौकडे वळवण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, लखनौ एटीसीने हवामान चांगले झाल्याचा संदेश दिला. त्यानंतर पुन्हा लखनौला विमान वळवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे विस्ताराकडून सांगण्यात आले. लखनौला पोहोचण्यापूर्वी असलेली कमी व्हिजिबिलीटीमुळेच इंधन कमी झाले होते. नियमांनुसार विमानामध्ये अतिरिक्त इंधन भरण्यात आले होते. तसेच प्रवासादरम्यान, विमानातील प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राथमिकता देण्यात आली होती. दरम्यान, पुन्हा इंधन भरल्यानंतर रात्री 1 वाजून 35 मिनिटांनी हे विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षितरित्या उतरवण्यात आल्याचे विस्तारा एअरलाइन्सच्या जनसंपर्क अधिकारी रश्मी सोनी यांनी सांगितले.

या घटनेमुळे 1993 च्या इंडियन एअरलाइन्सच्या ए-300 विमानाच्या आठवणी ताज्या केल्या. हैदराबादमध्ये लो व्हिजिबिलिटीमुळे इंधन संपल्यानंतर तिरूपतीजवळील एका शेतात हे विमान उतरवण्यात आले होते, असे सेफ्टी एक्सपर्ट मोहन रंगनाथन यांनी सांगितले.