विशाखापट्टणम विमानतळावर रविवारी अटक करण्यात आलेल्या तस्कराच्या पोटातून शस्त्रक्रियेद्वारे सोन्याची १४ बिस्कीटे काढण्यात आली आहेत. ती हस्तगत करण्यात आली आहेत. संभाव्य कारवाईपासून वाचण्यासाठी श्रीलंकेहून आलेल्या या तस्कराने बिस्कीटे गिळली होती.

विमानतळावरील सीमा शुल्क अधिकाऱ्यांनी रविवारी विशाखापट्टणम विमानतळावर एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतले होते. त्याची चौकशी केली. त्यावेळी त्याच्या पोटात सोन्याची बिस्कीटे असल्याचे उघड झाले. ती व्यक्ती सोन्याची तस्करी करत असल्याची माहिती मिळाली. यानंतर त्याला अटक करण्यात आली. अब्दुल रझ्झाक असे या सोने तस्कराचे नाव आहे. पोटातील सोन्याची बिस्कीटे काढण्यासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. विमानतळावरच त्याची तपासणी केली असता त्याच्या पोटात सोन्याची दोन बिस्कीटे असल्याचे उघड झाले होते. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल केले. त्याने सोन्याची १४ बिस्कीटे गिळली होती, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली.