केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांच्या पत्नी भारती सिंह यांना ब्लॅकमेल करून दोन कोटी रूपयांची मागणी केल्याचा गुन्हा नोंद असलेल्या प्रदीप चौहाननेच सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. व्ही. के. सिंह यांच्यापासून आपल्या जिवाला धोका असल्याची तक्रार त्याने गुडगाव पोलिसांत केली आहे. त्यामुळे या प्रकरणाला नवे वळण लागले आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनीही न्यायालयात सिंह यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यामुळे सिंह यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाली आहे.
याप्रकरणी आपल्याकडे ऑडिओ व व्हिडिओ स्वरूपात पुरावे असल्याचा दावा चौहान याने केला आहे. त्याने तक्रारीत व्ही. के. सिंह यांच्यासह पत्नी भारती, मुलगी मृणाली, जावई अरिदमन आणि मेवेंद्र सिंह अशा पाच जणांच्या नावाचा समावेष केला आहे.
चौहानने यू टयूबवर टाकलेल्या व्हिडिओतही सिंह यांच्यावर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले होते. भारती सिंह यांनी आपल्या तक्रारीत याचा उल्लेख केला होता. भारती सिंह यांनी तुघलक रोड पोलीसांत चौहानविरोधात ब्लॅकमेलिंग करत असल्याची तक्रार दाखल केली होती.
दरम्यान, व्ही. के. सिंह यांची मुलगी मृणाली यांनी आपल्या वकिलासह चौहानचे सासरे वेदपाल राघव यांची भेट घेतली होती. वेदपाल हे सोहना व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहेत. गैरसमजामुळे हे प्रकरण झाल्याचे वेदपाल यांनी भेटीनंतर सांगितले होते.